नवापूर तालुक्यातून एकाच दिवशी गायब झाल्या दोन अल्पवयीन तरुणी; दोघींच्याही पालकांनी केली फूस लावून पळवून नेल्याची तक्रार
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यातून एकाच दिवशी दोन तरुणींचे अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दोन्ही तरुणी अल्पवयीन असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, यापैकी एकीला नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तर दुसरीचे विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पळवून नेण्यात आले. या दोघींच्याही वडिलांनी दोन्ही संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आल्याची तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर पोलीस ठाण्यात एका मजुराने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या १७ वर्षे ३ महिने १९ दिवस वय असलेल्या त्यांच्या तरुण मुलीला अज्ञात व्यक्तीने २० मे रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. तीन दिवस वाट पाहूनही मुलगी घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी या बाबतीतील २३ मे रोजी दाखल केली.
तर दुसरी फिर्याद विसरवाडी पोलीस ठाण्यात एका शेतकर्याने २३ मे रोजी दाखल केली. यामध्ये आपल्या १७ वर्षे ८ महिने १८ दिवस वयाच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने रात्री १०.३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून फुस लावून पळवून नेले, असे या फिर्यादीत म्हटले आहे. या दोन्ही प्रकरणात अज्ञात व्यक्तींविरोधात नवापूर व विसरवाडी पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे तर दुसर्या प्रकरणात हवालदार संजय सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.



