राजकारण

शहरातील स्‍वच्‍छता, पथदिव्‍यांवरून विरोधक – सत्ताधारी भिडले; तळोदा न.प.ची सभा वादळी; विरोधकांच्‍या ‘सफाई करा’ला सत्ताधार्‍यांचे ‘पैसे भरा’ने उत्तर!

तळोदा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : तळोदा नगर परिषदेच्‍या सर्वसाधारण सभेत शहरातील साफसफाई, पथदिव्‍यांच्‍या मुद्द्यावरून विरोधी बाकावरील सदस्‍य आणि सत्ताधार्‍यांमध्‍ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शहरात न.प.कडून साफसफाई केली जात नसल्‍याचे सांगत विरोधकांनी सत्ताधार्‍यांना घेरण्‍याचा प्रयत्‍न केला. तर न.प.चे कर्मचारी केवळ सार्वजनिक जागांची स्‍वच्‍छता करतील. खासगी जागा स्‍वच्‍छ करून हव्‍या असतील तर पैसे भरावे लागतील, असे सांगत नगराध्‍यक्षा भाग्‍यश्री चौधरी यांनी विरोधकांच्‍या मुद्द्याची हवा काढून घेतली.
तळोदा न.प.ची सर्वसाधारण सभा नगराध्‍यक्षा भाग्‍यश्री चौधरी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडली. या सभेत अजेंड्यावर असलेल्‍या दहापैकी ९ विषयांना मंजुरी देण्‍यात आली असली तरी ही सभा सत्ताधारी व विरोधकांमध्‍ये झालेल्‍या खडाजंगीनेच अधिक गाजली. या सभेत विशेषत: विरोधी बाकांवरील सदस्‍यांमध्‍ये जवळपास सर्वच मुद्द्यांवर एकजूट दिसून आली.
सभेच्‍या सुरूवातीलाच माजी नगराध्‍यक्षा तथा सध्‍या विरोधी बाकावर असलेल्‍या रत्‍ना चौधरी यांनी शहरातील साफसफाईच्‍या मुद्द्यावर सत्ताधार्‍यांना घेरले. न.प.तील सत्ताधारी शहरावसीयांच्‍या जीवाशी खेळत असल्‍याचा आरोप करीत रत्‍ना चौधरी यांनी न.प.च्‍या आरोग्‍य विभागाचे कर्मचारी काही प्रभागांत स्‍वच्‍छतेसाठी बोलावूनही येत नसल्‍याचे सांगितले. त्‍यांचा हा मुद्दा विरोधी गटातील इतर नगरसेवकांनीही उचलून धरला. अनेक प्रभागांत घंटागाड्या फिरकतही नाहीत. चार-पाच दिवस कचरा संकलन होत नाही, असे सांगत विरोधकांनी याकडे सत्ताधारी लक्ष देत नसल्‍याचा आरोप केला. तर विरोधी पक्षाचे गटनेते अजय परदेशी यांनी स्‍वच्‍छतेबाबत सत्ताधारी आणि प्रशासनाकडून केवळ टोलवाटोलवी सुरू असल्‍याचा आरोप करीत या कामात प्रशासनाकडून तत्‍काळ सुधारणेची अपेक्षा व्‍यक्‍त केली.
पथदिवे ठेकेदाराची मनमानी
शिवसेनेचे नगरसेवक कपिल कर्णकार यांनी शहरातील पथदिव्‍यांचा विषय छेडत या कामाच्‍या ठेकेदाराच्‍या सुरू असलेल्‍या मनमानीवरून सत्ताधार्‍यांची कोंडी केली. ठेकेदाराने अनेक प्रभागांत ५० ऐवजी ३० वॅटचे दिवे बसवल्‍याचे सांगत त्‍यांनी अनेक ठिकाणी पथदिवे बंदच असल्‍याचे निदर्शनास आणून दिले. एवढेच नाही तर याबाबत जाब विचारावा तर ठेकेदार फोनच उचलत नसल्‍याचेही सांगितले. विरोधी गटातील अन्‍य सदस्‍यांनीही कर्णकार यांच्‍या सुरात सुर मिसळला. याला सत्ताधारी गटानेही प्रत्त्‍युत्तर देण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याने दोन्‍ही बाजूच्‍या सदस्‍यांमध्‍ये खडाजंगी पाहायला मिळाली. गेल्‍या महिन्‍यात अक्षय्‍य तृतीयेनिमित्त भरलेल्‍या कालिका माता यात्रोत्‍सवात न.प. कर्मचार्‍यांनी निश्‍चित केलेल्‍या दरापेक्षा जास्‍त वसुली केल्‍याचा आरोपही यावेळी विरोधकांनी केला. यानंतर संबंधित कर्मचार्‍याला सभेत बोलावण्‍यात आले. परंतु, तो कर्मचारी गैरहजर असल्‍याने या प्रकरणाची चौकशी करून त्‍याच्‍यावर कारवाई करण्‍याचे आदेश देण्‍यात आले.
खासगी सफाईसाठी पैसे भरा
विरोधकांनी विषय छेडायचा आणि सत्ताधार्‍यांनी तो मुद्दा खोडून काढायचा, असे चित्र संपूर्ण सभेमध्‍ये दिसून आले. शहरातील स्‍वच्‍छतेच्‍या मुद्द्यावर विरोधकांनी घेरण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यानंतर सत्ताधार्‍यांनीही त्‍यांना सडेतोड उत्तर देण्‍याचा प्रयत्‍न केला. विरोधक शहरातील स्‍वच्‍छतेच्‍या नावाखाली खासगी जागेतील साफसफाई करून घेण्‍याचे घोडे दामटत असल्‍याचा आरोप सत्ताधार्‍यांनी केला. न.प. कर्मचार्‍यांकडून शहरातील सर्व सार्वजनिक जागांची स्‍वच्‍छता केली जात असल्‍याचा दावा करीत सत्ताधार्‍यांनी खासगी जागी साफसफाईचा ठेका न.प.ने घेतला नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले. खासगी जागी सफाई करून हवी असेल तर त्‍या बदल्‍यात संबंधितांना शुल्‍क भरावे लागेल, असेही सत्ताधार्‍यांनी विरोधकांना सुनावले. विरोधकांकडे विकासाच्‍या मुद्द्यावर बोलण्‍यासाठी मुद्देच नसल्‍याने ते विकास कामात अडथळे आणून नको त्‍या मुद्द्यांवर राजकारण करीत असल्‍याचा आरोप यावेळी नगराध्‍यक्षा भाग्‍यश्री चौधरी यांनी केला.
दरम्‍यान, या गोंधळातच सभेपुढील विषयपत्रिकेवरील १० पैकी ९ विषयांना मंजुरी देण्‍यात आली. तर एक विषय स्‍थगित ठेवण्‍यात आला. या सभेला उपनगराध्‍यक्षा शीतल पाडवी, विरोधी पक्षाचे गटनेते अजय परदेशी, सभापती कल्‍पेश चौधरी, प्रतिभा पाडवी यांच्‍यासह अनुप उदासी, रामानंद ठाकरे, रत्‍ना चौधरी, प्रतीक्षा दुबे, मीराबाई कोळी, जयश्री महाले, लक्ष्‍मी नाईक, मोनिका माळी, हर्षा पाडवी, गायत्री पिंपरे, हितेंद्र क्षत्रिय, अरविंद प्रधान, शिरीष माळी, गिरीधर सागर, इम्रान खाटीक, कपिल कर्णकार, नदीम शेख या नगरसेवकांची उपस्‍थिती होती. प्रशासन अधिकारी कमलेश काळे, अधीक्षक राजेंद्र माळी, सनी ठाकरे, निरीक्षक संतोष मोरे, लेखापाल नितीन कढरे, नितीन शिरसाठ यांच्‍यासह अन्‍य कर्मचार्‍यांनी या सभेच्‍या यशस्‍वितेसाठी प्रयत्‍न केला.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button