दोन महासतीजींच्या अपघाती निधनाने जैन समाज संतप्त; शहाद्यात उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देत संत सुरक्षा व न्यायाची मागणी

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : समाधी सम्राट आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांच्या सुयोग्य शिष्या तसेच आचार्य श्री समयसागर जी महाराज यांच्या आज्ञेनुवर्ती परम पूज्य १०५ श्रुतमति माताजी व परम पूज्य १०५ उपशममति माताजी या पायी विहार करत असताना वाहन चालकाने अंगावर वाहन घालून चिरडल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या भीषण अपघातात दोन्ही महासतीजींचे निधन झाल्याने जैन समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
जैन समाजासाठी अत्यंत वेदनादायी व संतापजनक ठरलेल्या या घटनेच्या निषेधार्थ आज मंगळवारी (दि. २६) शहादा येथे सकल जैन श्री संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी (एसडीएम) यांना निवेदन देण्यात आले. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच जैन संतांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहाद्याचे तहसीलदार साहेब संभाजी पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी सकल जैन संघांचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटिया, शहादाच्या उपनगराध्यक्षा माधवी पाटील, चतुर्वीद संघांचे प्रमुख अध्यक्ष ॲड. प्रदीप टाटिया, कैलास संचेती, फुलचंद लोढा, विजय चोपडा, मदनलाल लुंकड, विनयचंद्र गांधी, पारसमल कुचेरिया, पापाशेट नाहटा, शहादाचे नगरसेवक ललित छाजेड, भरत ओस्तवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोतीलाल जैन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विनोद गेलडा पंकज चोपडा, भवरलाल जैन, मनोज बाफना, प्रदीप देसरडा, बबलू संचेती, समीर टाटीया, सुनील कोटडिया, गुड्डू शेठ नहाटा, जैन तीर्थंकर लेणी येथील पवन जैन, निर्मल जैन, राजू ललवाणी, मयूर चोरडिया, जैन समाजातील सर्व नवयुवक, समता युवा संघ, मूर्तिपूजन युवा संघ, तेरापंथी युवक परिषद आदींचे पदाधिकारी संजय कासोदेकर, गोरख तांबोळी, प्रविण छलानी, दिलीप खिवसरा, अनिल छाजेड, संयम कोचर आदी उपस्थित होते.
शहादा शहर व परिसरातील जैन बांधवांनी मोठ्या संख्येने उपविभागीय अधिकारी कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येत संत सुरक्षा व धर्मसंरक्षणासाठी एकजुटीचा संदेश दिला. यावेळी “जैन एकता – संत सुरक्षा – धर्मसंरक्षणासाठी एकजूट आवश्यक आहे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.



