महाराष्ट्र

नंदुरबार बनले तस्‍करीचे द्वार : गुजरात-मध्य प्रदेशातून गुटख्याची महाराष्ट्रात ‘शाही’ एन्ट्री; यंत्रणेची डोळेझाक तस्‍करांच्‍या पथ्‍यावर, साखळी उद्ध्वस्त करण्याचे आव्‍हान

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू होऊन तब्बल १४ वर्षे उलटली असली तरी नंदुरबार आणि शहादा परिसरात गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने गुटखाबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा महाराष्ट्रात दाखल होत असून, यामुळे ही तस्‍करी रोखण्‍याची जबाबदारी असलेल्‍या यंत्रणा नेमके काय करीत आहेत, असा संतप्‍त सवाल केला जात आहे.
नंदुरबार जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमांशी जोडलेला आहे. यामुळेच हा जिल्‍हा तस्करांसाठी महत्त्वाचा मार्ग बनल्याचे बोलले जात आहे. शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव आणि नंदुरबार परिसरातील अनेक पानटपऱ्या, किराणा दुकाने व छोट्या विक्रेत्यांकडे गुटखा सहज उपलब्ध होतो. हा माल किरकोळ विक्रेत्यांपर्यंत नेमका कोण पोहोचवतो आणि त्याला कोणाचे पाठबळ आहे, असे प्रश्‍न स्‍थानिकांकडून केले जात आहेत.
पोलीस, अन्न व औषध प्रशासन आणि विविध तपास यंत्रणांकडून वेळोवेळी गुटखा जप्तीच्या कारवाया केल्या जात असल्या तरी या कारवाया गुटखा महाराष्‍ट्रात दाखल झाल्‍यानंतर प्रामुख्याने किरकोळ साठे किंवा वाहतुकीपुरत्याच मर्यादित राहत असल्याचे दिसते. असे असेल तर राज्‍याच्‍या सीमेवरच या गुटखा तस्‍करांना रोखण्‍यात यंत्रणांना रोखते कोण आणि नंदुरबारमध्‍ये गुटखा जिल्ह्यात दाखल झाल्‍यानंतर त्‍याचे मोठे पुरवठादार, साठेबाज आणि वितरण साखळीतील प्रमुख घटक अद्यापही कारवाईच्या कक्षेबाहेर कसे राहतात, असा प्रश्‍न स्‍थानिकांना पडला आहे.
सीमेवरील तपासणी नाक्यांवर नेमकी किती वाहने तपासली जातात, कोणत्या वेळेत तपासणी होते, जप्तीची आकडेवारी किती आहे आणि तस्करी रोखण्यात सातत्याने अपयश का येते, याबाबत स्वतंत्र चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे. काही वेळा मालवाहू वाहनांमधील इतर वस्तूंच्या आडून गुटखा आणला जातो, तर काही ठिकाणी खासगी वाहनांचा वापर करून ग्रामीण व दुर्गम मार्गांमधून तस्करी केली जात असल्याची चर्चा आहे.  विशेष म्हणजे, राज्य सरकारकडून गुटखाविरोधात कठोर भूमिका घेतली जात असताना प्रत्यक्षात सीमावर्ती भागातून तस्‍करी आणि जिल्‍ह्यात आल्‍यानंतर त्‍याची खुलेआम विक्री सुरूच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे केवळ जप्तीच्या कारवायांवर समाधान न मानता गुटखा पुरवठ्याची संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करणे, सीमावर्ती भागातील तस्करीवर प्रभावी नियंत्रण मिळवणे आणि मोठ्या पुरवठादारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत जिल्‍ह्यातील स्‍थानिकांकडून व्यक्त होत आहे.
गुटखाबंदी केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात प्रभावी ठरावी, यासाठी पोलीस, अन्न व औषध प्रशासन, महसूल विभाग आणि सीमावर्ती तपास यंत्रणांनी समन्वयाने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा गुटखाबंदी ही केवळ घोषणा आणि जप्तीच्या कारवाया केवळ आकडेवारीपुरत्याच मर्यादित राहतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button