गुन्हे वार्ता

नंदुरबार जिल्‍हा हादरला : उसनवारीवर दिलेल्‍या पैशांच्‍या वसुलीसाठी थेट गोळीबार; बिलाडी शिवारातील थरारक घटना, दोन जखमी

नंदुरबार (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : अवघ्‍या नंदुरबार जिल्‍ह्याला हादरून टाकणारी घटना मंगळवारी (दि. २६) सांयकाळी उशीरा नंदुरबार तालुक्‍यातील बिलाडी शिवारात घडली. शेतीकामासाठी दिलेल्‍या पैशांच्या वसुलीच्‍या वादातून एकाने थेट शेतकर्‍यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संजय माळी हे बिलाडी शिवारात शेतीचे काम करत असताना संजय ठाकरे याने त्यांच्यावर गोळी झाडल्याचे सांगण्‍यात येत आहे. शेतीच्या कामासाठी संजय माळी यांनी संजय ठाकरे यांना उसनवारीवर काही पैसे दिले होते. मात्र, दिलेले पैसे परत न मिळाल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. याच वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा दरम्यान घटनास्थळावरून एक राऊंड फायर झालेल्या काडतुसाचे कवच जप्त करण्यात आले आहे. या घटनेत दोन्ही व्यक्ती जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अफवांवर विश्‍वास नको : पोलीस अधीक्षक़
या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी तत्‍काळ घटनास्‍थळी भेट देतानाच जिल्‍हावासीयांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणातील संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही सानप यांनी स्पष्ट केले आहे. घटनेमागील नेमके कारण आणि गोळीबाराची संपूर्ण पार्श्वभूमी तपासानंतर स्पष्ट होणार असून, या घटनेकडे जिल्‍हावासीयांचे लक्ष लागले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button