नंदुरबार जिल्हा

रेल्‍वे गेटमनला मारणार्‍या जितेंद्र वसावेला चार वर्षांचा सश्रम कारावास अन्‌ सहा हजारांचा दंड!; अति. जिल्‍हा व सत्र न्‍यायालयाचा निकाल; सरकारी कामात अडथळा आणणे भोवले

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : रेल्‍वे रुळावर चुकीच्‍या पद्धतीने वाहन उभे करून त्‍याचा जाब विचारणार्‍या रेल्‍वे गेटमनला मारहाण करणारा सिमेंट मिक्‍सर या अवजड वाहनाचा चालक जितेश सायतराव वसावे (३२) या नवापूर तालुक्‍यातील युवकाला न्‍यायालयाने चार वर्षांचा सश्रम कारावास आणि सहा हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्‍त जिल्‍हा व सत्र न्‍यायालयाने हा निकाल दिला. २ जून २०२१ रोजी ही घटना घडली होती.
नवापूर महामार्गावरील नवरंग रेल्‍वे गेट नं ६९ येथे जितेंद्र वसावे (रा. पाटील फळी रायंगन, ता. नवापूर, जि. नंदुरबार) याने २ जून २०२१ रोजी दुपारी ४ वाजता रेल्‍वे रुळावरच सिमेंट मिक्‍सर हे अवजड वाहन उभे केले होते. यावेळी वाहतूक कोंडी झाल्‍यावर वाहन बाजूला घेण्‍याऐवजी जितेंद्र व त्‍याचा सहचालक यांनी अन्‍य वाहनधारकांशी वाद घालण्‍यास सुरूवात केली. यानंतर त्‍याठिकाणी कार्यरत असलेले गेटमन कन्हैया अजित कोकणी (२८) यांनी या दोघांना रोखून वरिष्‍ठांच्‍या आदेशावरून त्‍यांच्‍या वाहनाचा क्रमांक नोंद करून घेतला. याचा राग आल्‍याने जितेंद्र व त्‍याच्‍या आणखी तीन साथीदारांनी नंतर कोकणी यांना लोखंडी रॉडने मारहाण केली होती.
या प्रकरणी कन्हैया कोकणी यांनी नवापूर पोलीस ठाण्‍यात फिर्याद नोंदवली होती. नवापूरचे तत्‍कालिन पोलीस उपनिरीक्षक नासिरखान पठाण यांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून महत्त्‍वाचे पुरावे गोळा करीत जितेंद्र वसावे व त्‍याच्‍या तीन साथीदारांविरोधात मुदतीत न्‍यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्‍याची सुनावणी अतिरिक्‍त जिल्‍हा व सत्र न्‍यायालयात चालली. साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांच्‍या साक्षी व पुराव्‍यांच्‍या आधारे गुन्‍हा सिद्ध झाल्‍याने न्‍यायालयाने जितेंद्र वसावे याला भादंविच्‍या कलम ३५३ व ३३२ अंतर्गत चार वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर कलम ३३२ अंतर्गत एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपयांचा अतिरिक्‍त दंड अशी शिक्षा सुनावण्‍यात आली. या दोन्‍ही शिक्षा आरोपीने एकत्रित भोगावयाच्‍या आहेत.
या खटल्‍यात सरकारी पक्षाच्‍या वतीने अतिरिक्‍त सरकारी अभियोक्‍ता ॲड. व्‍ही.सी. चव्‍हाण यांनी काम पाहिले. तर पैरवी अधिकारी म्‍हणून पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते, पैरवी अंमलदार पोहेकॉ नितीन साबळे, शैलेंद्र जाधव, पोकॉ देवेंद्र पाडवी यांनी काम पाहिले. तपास अधिकारी तसेच सरकारी अभियोक्‍ता यांचे पोलीस अधीक्षक अश्‍विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, जिल्‍हा सरकारी वकील विनोद गोसावी यांनी अभिनंदन केले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button