नंदुरबार जिल्ह्यात गुटखाबंदीची ऐसीतैशी : माफियांचा सुळसुळाट, खुलेआम सुरू आहे विक्री; प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्यात गुटखाबंदी लागू असतानाही नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये विविध प्रकारच्या गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. विशेषतः नंदुरबार, शहादा आणि परिसरातील अनेक पानटपऱ्या, किराणा दुकाने तसेच छोट्या विक्रेत्यांकडे ‘शौकिनां’साठी सहजपणे गुटखा उपलब्ध होत आहे. असे असताना गुटखामाफियांना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्यावर कारवाईसाठी प्रशासनाचे हात कुणी बांधले आहेत, असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे.
संबंधित विभागांकडून अधूनमधून कारवाया केल्या जात असल्या तरी त्या केवळ कागदोपत्री आकडेवारीपुरत्याच मर्यादित राहतात. किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून प्रशासन आपली जबाबदारी पूर्ण झाल्याचे दाखवत असले, तरी गुटख्याच्या मोठ्या रॅकेटपर्यंत पोहोचून मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई होत नसल्याची टीका होत आहे.
गुटखा तस्करीमागील आर्थिक साखळी मजबूत असल्याने या व्यवसायावर पूर्णपणे आळा बसत नसल्याचे जाणकारांचे मत आहे. गुटखा माफियांच्या आर्थिक जाळ्यावर प्रहार झाला तरच गुटखाबंदी प्रभावी ठरू शकते, अन्यथा अशा कारवाया केवळ ‘फुसका बार’ ठरत असल्याची भावना सामान्यांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, जिल्ह्यात युवकांमध्ये वाढते व्यसन हे गंभीर सामाजिक संकट बनत चालले आहे. गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि इतर अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असल्याने आरोग्याबरोबरच सामाजिक समस्याही अधिक गंभीर होत आहेत. काही वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने ‘अमली पदार्थमुक्त जिल्हा’ करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तंबाखूजन्य पदार्थ आणि अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचे वास्तव समोर येत आहे.
अन्न व औषध प्रशासन, पोलीस विभाग, महसूल यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वय साधून विशेष मोहीम राबवावी, सीमावर्ती भागातून होणारी अवैध वाहतूक रोखावी, गुटखा माफियांच्या मुख्य साखळीवर धडक कारवाई करावी आणि युवकांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रभावी जनजागृती व पुनर्वसन उपक्रम राबवावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. गुटखाबंदीचा कायदा कागदावरच राहणार की गुटखामाफियांविरोधात खऱ्या अर्थाने निर्णायक कारवाई होणार, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.



