नंदुरबारमध्ये ‘पाणीबाणी’ : आधीचे काम पूर्ण झाल्यावर काही तासांनीच रेल्वे अंडरपास कामादरम्यान पाईपलाईन फुटली; शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत, दुरुस्ती युद्धपातळीवर

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मी मी म्हणणार्या उन्हाने अंगाची लाहीलाही केली असतानाच आता नंदुरबारकरांच्या तोंडचे पाणी देखील पळाले आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी रेल्वे अंडरपासच्या कामादरम्यान पुन्हा एकदा फुटल्याने शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नळवा रस्त्यावरील रेल्वे अंडरपासच्या ठिकाणी सुरू असलेल्या खोदकामामुळे ही घटना घडली असून, पालिका प्रशासनाने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.
दोन ते तीन दिवसांपूर्वीही याच भागात पाईपलाईन फुटल्याने रेल्वे पट्ट्यालगतच्या अनेक वस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. पालिकेच्या अथक प्रयत्नांनंतर काल सायंकाळी उशिरा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्याला काही तास उलटत नाही तोच रेल्वे विभागाच्या यंत्रणेकडून पुढील खोदकाम सुरू असताना पाईपलाईन पुन्हा फुटली. यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले.
या भागात पाणी नाही…
या घटनेमुळे आदेश्वरनगर जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला. परिणामी गिरीविहार, लक्ष्मी नगर, सरस्वती नगर, विमल विहार, दादावाडी, हमालवाडा, एमएल टाऊन, वैशाली नगर तसेच नवी-जुनी सिंधी कॉलनी या परिसरातील रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
दुरूस्तीची ’लगीनघाई’
पाईपलाईन दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून धुळे येथून विशेष तांत्रिक पथकही बोलावण्यात आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. पाणीपुरवठा विभागाचे सभापती कैलास पाटील, मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी उपस्थित राहून कामाचा आढावा घेत आहेत. पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. मात्र दुरुस्तीच्या स्वरूपामुळे शहरातील काही भागांमध्ये पुढील एक ते दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनासोबतच आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, वारंवार पाईपलाईन फुटण्याच्या घटनांमुळे रेल्वे अंडरपासच्या कामांबाबत समन्वयाची आवश्यकता असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.



