नंदुरबार जिल्हा

उन्‍हामुळे शरीर अन्‌ विजेअभावी पिके करपली; दोन दिवसांना चारच तास वीजपुरवठा; शहादा तालुक्‍यातील संतापलेल्‍या शेतकर्‍यांचा ‘महावितरण’ला घेराव, दोन दिवसांची दिली मुदत

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : उन्‍हाच्‍या कडाक्‍याने शरीराची लाहीलाही होत असतानाच शहादा तालुक्‍यातील मोहिदा-सोनवद परिसरातील शेतकरी वीजेच्‍या लपंडावामुळे हैराण झाले आहेत. दोन दिवसांतून फक्‍त चारच तास वीज पुरवठा होत असल्‍याने या भागातील शेतांतील पिके करपू लागली आहेत. महावितरण या परिस्‍थितीकडे दूर्लक्ष करीत असलेल्‍या संतापलेल्‍या शेतकर्‍यांनी अखेर शहाद्यातील महावितरणच्‍या कार्यकारी अभियंता कार्यालयाला घेराव घालून जाब विचारला. दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळित न झाल्‍यास तीव्र जनआंदोलन छेडण्‍याचा इशाराच यावेळी संतप्‍त शेतकर्‍यांनी दिला.
मोहिदा-सोनवद परिसरात गेल्‍या तीन ते चार महिन्‍यांपासून शेतकर्‍यांना अपुर्‍या वीजपुरवठाच्‍या संकटाचा सामना करावा लागत आहे. मिरची, पपई, केळी, कापूस आदी पिकांसाठी शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात खतांची खरेदी करून ठेवली आहे. मात्र, वीजेअभावी पाणी उपलब्‍ध होत नसल्‍याने ही पिके करपू लागली आहेत. यामुळे वैतागलेल्‍या शेतकर्‍यांनी अखेर सगळा संताप या समस्‍येसाठी जबाबदार असलेल्‍या महावितरण कंपनीवर काढला.
मंगळवारी मोहिदा-सोनवद परिसरातील १२५ ते १५० शेतकर्‍यांनी एकजुटीची वज्रमुठ आवळत महावितरणच्‍या शहादास्‍थित कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. सुमारे दीड तास शेतकरी याच ठिकाणी ठाण मांडून होते. या काळात उपकार्यकारी अभियंता ए.टी. पाटील यांनी या शेतकर्‍यांशी चर्चा केली. मोहिदा सबस्‍टेशनचे निम्‍म्‍याहून अधिक काम पूर्ण झाले असून, पुढील महिनाभरात या परिसरातील वीजपुरवठा नियमित होईल, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. यामुळे शेतकर्‍यांचा संताप अधिकच वाढला. ‘महिनाभराचे काही सांगू नका’, अशा शब्‍दांत शेतकर्‍यांनी पाटील यांना सुनावले. यावेळी शेतकरी आणि महावितरणच्‍या अधिकार्‍यांमध्‍ये जोरदार खडाजंगी झाली. पुढच्‍या दोन दिवसांत या परिसरातील वीजपुरवठा नियमित न झाल्‍यास मोठे जनआंदोलन उभारण्‍यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलक शेतकर्‍यांच्‍या वतीने भाऊभाई पाटील यांनी उपकार्यकारी अभियंता ए.टी. पाटील यांनी दिला.
दरम्‍यान, शेतकर्‍यांची आक्रमकता पाहून अखेर उपकार्यकारी अभियंता ए.टी. पाटील यांनी शेतकर्‍यांच्‍या प्रतिनिधींना सोबत घेत थेट १३२ केव्‍ही सबस्‍टेशन गाठले. त्‍या ठिकाणी सबस्‍टेशनमधील कामांची पाहणी करतानाच दोन्‍ही बाजूंमध्‍ये तांत्रिक अडचणी, लोड व्‍यवस्‍थापन आणि वीजपुरवठा सुरळीत करण्‍याच्‍या दृष्‍टीने करावयाच्‍या उपाययोजना आदींबाबत चर्चा झाली. आता पुढील शुक्रवारनंतर या मुद्द्यावर शेतकरी कोणता पवित्रा घेतात, याकडे परिसरासह संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button