महाराष्ट्र

पोक्‍सो कायद्याची ऐसीतैसी : अल्‍पवयीन अत्‍याचार पीडितेची आरोग्‍य-पोलीस यंत्रणेकडून हेळसांड; तपासणीसह गुन्‍हा दाखल करण्‍यासाठी १८ तास पाहावी लागली वाट!

बीड (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : महिलांवर अत्‍याचार करणार्‍यांवर ‘पोक्‍सो’ कायद्यांतर्गत कारवाई करून त्‍यांना धडा शिकविला जातो. या अंतर्गत अत्‍याचार पीडितेच्‍या तक्रारीची तातडीने दखल घेणे सरकारी यंत्रणांना बंधनकारक असले तरी बीड जिल्‍ह्यातील भावनाशून्‍य आरोग्‍य आणि पोलीस यंत्रणेने मात्र एका अत्‍याचार पीडितेला आरोग्‍य तपासणी आणि गुन्‍हा दाखल करण्‍यासाठी तब्‍बल १८ तास ताटकळत ठेवल्‍याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सरकारी यंत्रणेच्‍या या कमालीच्‍या संवेदनशीलता व अमानुषपणाबाबत संताप व्‍यक्‍त होत असून, संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.
बीड जिल्‍ह्याच्‍या केज तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत मामाच्‍या मुलाने अत्याचार केल्याची घृणास्पद घटना घडली. आरोपीने पीडित मुलीचे तोंड रुमालाने दाबून व हात दोरीने बांधून तिच्यावर शारीरिक अत्‍याचार केला. या घटनेनंतर सदर मुलीने भेदरलेल्‍या अवस्‍थेतच घर गाठून कुटुंबियांकडे आपबिती व्‍यक्‍त केली. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तात्काळ कायदेशीर आणि वैद्यकीय मदतीसाठी पावले उचलली. मात्र, त्यांना सरकारी शासकीय यंत्रणेकडून अतिशय क्लेशदायक असा प्रतिसाद मिळाला.
आरोग्य विभागाचा निर्लज्‍जपणा
अत्‍याचार पीडित मुलीला कुटुंबियांनी तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी केज येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, या रुग्णालयात उपस्थित माणुसकीशून्‍य कर्मचाऱ्यांनी त्‍यांना मुलीच्‍या तपासणीसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याचे सांगत थांबून ठेवले. सकाळी ११ ते रात्री ९ असे तब्‍बल १० तास का कारणामुळे रुग्‍णालयात ताटकळून बसण्‍याची वेळ या पीडितेवर आली. गंभीर गुन्ह्यातील अल्पवयीन पीडितेच्‍या तपासणीसाठी आरोग्‍य यंत्रणेने दाखवलेल्‍या निष्काळजीपणामुळे संताप व्‍यक्‍त होत आहे.
पोलीस यंत्रणाही भावनाशून्‍य  
रुग्‍णालयात १० तास प्रचंड त्रास सहन केल्‍यानंतर अखेर रात्री ९ वाजता पीडितेची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली. यानंतर घडल्‍या प्रकाराबाबत तक्रार दाखल करण्‍यासाठी तातडीने पीडितेसह तिच्‍या कुटुंबियांनी केज पोलीस ठाणे गाठले. मात्र, तिथेही त्यांना पोलीस यंत्रेणच्‍या दिरंगाईला सामोरे जावे लागले. चौकशी, जबाब आणि बाकीचे सोपस्‍कार पूर्ण करून प्रत्‍यक्ष गुन्‍हा दाखल करण्‍यासाठी पहाटेचे ५ वाजवले. म्हणजे केवळ गुन्ह्याची नोंद करण्‍यासाठी पोलिसांना तब्‍बल ८ तासांचा कालावधी लागला. आधीच मानसिक आणि शारीरिक छळ सहन केलेल्या या पीडितेसह तिच्या पालकांना अवघी रात्र पोलीस ठाण्याच्या बाकावर जागून काढावी लागली.
माणुकसीशून्‍य शासकीय यंत्रणेवर संताप
या संपूर्ण प्रकारामुळे केजमधील आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन या दोन्ही यंत्रणांवर स्‍थानिकांकडून कडक शब्दांत टीका करीत संताप व्‍यक्‍त होत आहे. पोक्सो कायद्यांतर्गत अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवर अत्यंत जलद व संवेदनशीलतेने तपासणी व गुन्हा नोंदीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. असे असताना या प्रकरणात पीडितेसह तिच्‍या कुटुंबियांना मात्र तब्‍बल १८ तास रुग्णालयात आणि पोलीस ठाण्यात ताटकळत राहावे लागले. यामुळे स्‍थानिक संतापले असून, या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी डॉक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button