दे दणादण : लग्नात नाचण्यावरून आधी हाणामारी, जाब विचारण्यावरून पुन्हा दोन गट भिडले; गेंदा-बिलगावातील आठ जणांवर धडगाव पोलिसांत गुन्हा

धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : लग्नात नाचण्यावरून वाद झाल्यानंतर हाणामारी झाल्यावर त्याचा जाब विचारायला आलेले आणि आधीचे मारहाण करणारे यांनी परस्परांवर लाठ्याकाठ्यांनी हल्लाबोल केल्याची घटना धडगाव तालुक्यातील बिलगाव डुप्कुनपाडा येथे घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, गेंदा व बिलगाव येथील एकूण आठ जणांवर धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिलगाव येथील सिंगला भामट्या पावरा यांच्या भाच्याच्या लग्नात नाचण्याच्या वादातून गेंदा येथील काही मुलांना मारहाण करण्यात आली होती. त्यावेळी हा वाद मिटविण्यात आला असला तरी काही काळाने गेंदा येथील काही जण बिलगाव येथे या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेले होते. दुसर्या गावातून लोक आले म्हणून सिंगला पावरा हे त्यांची विचारपूस करण्यासाठी सामोरे गेले. यावेळी आलेल्या चौघांनी त्यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण सुरू केली. यानंतर सिंगला पावरा यांनी धडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. यावरून प्रताप दग्या पावरा, भरत नर्या पवार, बोंदर्या नायर्या पावरा आणि रायसिंग भोंग्या पावरा (सर्व रा. गेंदा, ता. धडगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
गेंदा येथील मुलांना मारहाण झाल्यानंतर जाब विचारण्यासाठी विलास पावरा यांच्यासह काही जण बिलगाव येथे गेले होते. यावेळी सिंगला भामट्या पावरा, गुमान भामटा पावरा, मालसिंग हुकल्या पावरा व खोमशा सिंगला पावरा (सर्व रा. बिलगाव आडीबुडीपाडा) यांनी त्यांना मारहाण सुरू केली. यावेळी विलास पावरा यांच्या मदतीला धावलेले दिनेश पावरा हे जखमी झाले. यानंतर तक्रारीवरून वरील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले. सध्या धडगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



