चोरट्यांकडून आता आश्रमही टार्गेट : शहाद्याच्या फेसमधील श्री धर्मराज आश्रमात घुसून ८ लाखांचा ऐवज लंपास; रोख रकमेसह दागिनेही लांबवले

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हाभरातील घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठाण्यांना लक्ष करून लक्षावधी रुपयांच्या रकमेसह मोठ्या ऐवजावर डल्ला मारल्यानंतर आता चोरट्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आश्रमांना देखील टार्गेट केले आहे. शहादा तालुक्यातील फेस येथील आचार्य श्री धर्मराज आश्रमात मध्यरात्री घुसून अज्ञात चोरट्यांनी रोकड आणि दागिने असा तब्बल आठ लाखांहून अधिक रकमेच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सारंगखेडा पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेस गावात श्री धर्मराज आश्रम असून, चोरट्यांनी या आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी महिलांच्या राहण्याच्या खोल्यांत प्रवेश करून तेथील कपाटे, पेट्या. बॅगा व लॉकर्स आदींची तोडफोड करून हाती येईल तो ऐवज लंपास करून पोबारा केला. यात ३ लाख ४८ हजार रुपयांची रोकड, सोन्याच्या अंगठ्या, चेन, मंगळसूत्र, बाळ्या, टिकल्या, चांदीचे पूजेचे साहित्य, समई, ताटे, वाट्या तसेच अन्य मौल्यवान वस्तू आदींचा समावेश आहे. चोरीला गेलेल्या संपूर्ण ऐवजाची एकत्रित आठ लाख ६ हजार ४०० रुपये आहे. या प्रकरणी आश्रमाच्या व्यवस्थापनाशी संबंधित असलेले अनिल गुरुदत्तदादा महानुभव यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलिसांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच चोरट्यांचा माग काढण्यासाठी तत्काळ श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. या श्वानाने दोंडावाडे गावातील रस्त्याच्या परिसरापर्यंत चोरट्यांचा माग काढला. मात्र, हे श्वान पुढे जावू शकले नाही.
दरम्यान, फेस गावात अवघ्या महिनाभरात झालेली चोरीची दुसरी मोठी घटना असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय येथून जवळच असलेल्या तोरखेडा येथेही अशीच मोठी चोरीची घटना घडली होती.



