नंदुरबार जिल्हा

तिलालीतील ‘त्‍या’ प्रकरणी अकस्‍मात मृत्‍यूची नोंद; जमीन कंपनीच्‍या नावे असल्‍याचे समजताच शेतकर्‍याने सोडले होते प्राण; ८ नातेवाईकांवर मृतदेहाची हेळसांड केल्‍याप्रकरणी गुन्‍हा

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : करार संपला तरी आपली जमीन अजूनही सुझलॉन कंपनीच्‍या नावे असल्‍याची कागदपत्रे पाहताच शेतकर्‍याचा मृत्‍यू झाल्‍याची धक्‍कादायक घटना नंदुरबार तालुक्‍यातील तिलाली येथे घडली. यानंतर कंपनीचे अधिकारी जागेवर येवून खुलासा करीत नाहीत, तोपर्यंत शेतकर्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करू देणार नाही, अशी भूमिका शेतकर्‍याच्‍या नातेवाईकांनी घेतल्‍याने तणाव निर्माण झाला होता. अखेर या प्रकरणी मृतदेहाची हेळसांड केल्‍याप्रकरणी सदरील शेतकर्‍याच्‍या ८ नातेवाईकांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला असून, शेतकर्‍याच्‍या मृत्‍यूची अकस्‍मात मृत्‍यू म्‍हणून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्‍यात नोंद करण्‍यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तिलाली येथील नामदेव तुळशीराम पाटील (७५) यांनी त्‍यांच्‍या शेतातील २५ गुंठे जमिनीवर टॉवर उभारण्‍यासाठी सुझलॉन कंपनीसोबत करार केला होता. या संदर्भातील करार चार वर्षांपूर्वी संपूनही कंपनीची वाहने पाटील यांच्‍या शेतातून ये-जा करीत होती. प्रत्‍येक वेळी अडवल्‍यावर कंपनीचे अधिकारी वेळ मारून नेत. रविवारी सकाळी पुन्‍हा कंपनीची वाहने आपल्‍या शेतात आल्‍यावर पाटील यांनी त्‍यांना अडवले. यावेळी कंपनीच्‍या कर्मचार्‍यांनी बोलावल्‍यावर अधिकार्‍यांनी तेथे येवून पाटील यांना काही कागदपत्रे दाखविली. पाटील यांची तब्‍बल सहा एकर जमीन कंपनीच्‍या नावावर असल्‍याचे पुरावे अधिकार्‍यांनी दाखवताच पाटील यांना मानसिक धक्‍का बसून सोमवारी दुपारी तीन वाजेच्‍या सुमारास त्‍यांचा मृत्‍यू झाल्‍याचा आरोप पाटील यांच्‍या नातेवाईकांनी केला होता.
यानंतर नातेवाईकांनी कंपनीचे वरिष्‍ठ अधिकारी घटनास्‍थळी येऊन योग्‍य निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत पाटील यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार न होऊ देण्‍याची भूमिका घेतली होती. यामुळे तणाव निर्माण झाल्‍यानंतर नंदुरबार तालुका पोलीस ठाण्‍याचे निरीक्षक दिनेश भदाणे यांनी सहकार्‍यांसह घटनास्‍थळी धाव घेत पाटील यांच्‍या नातेवाईकांची समजूत काढण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, नातेवाईक आपल्‍या भूमिकेवर ठाम राहिल्‍याने उशीरापर्यंत पाटील यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार होवू शकले नव्‍हते.
दरम्‍यान, अखेर रात्री उशीरा या प्रकरणी पोलिसांनी कडक भूमिका घेत पाटील यांच्‍या ८ नातेवाईकांवर मृतदेहाची विटंबना केल्‍याप्रकरणी गुन्‍हा दाखल केला. सध्‍या श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पवार या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. तर नंतर पाटील यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्‍णालयात हलविला. आज मंगळवारी पाटील यांच्‍या मृतदेहाची उत्तरीय तपासणी उशीरापर्यंत सुरू होती.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button