नंदुरबार शहर

आ. चंद्रकांत रघुवंशी भाजपवर भडकले; उपरोधिक टोला हाणत म्‍हणाले, भाजपला सभात्‍यागासाठी सोपे पडेल, असे वादग्रस्‍त विषय यापुढे न.प.मध्‍ये आधी चर्चेला घेऊ!

नंदुरबार (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत कत्तलखान्याच्या विषयावरून निर्माण झालेला वाद आता शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला असून, या मुद्द्यावर सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. सभेतील सहाव्या क्रमांकाच्या विषयावर झालेल्या गदारोळाची चर्चा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात रंगली असून, या वादामुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना नेते आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी या मुद्द्यावरून भाजपवर हल्‍लाबोल करीत जोरदार तोंडसुख घेतले आहे.
नगर पालिकेची सर्वसाधारण सभा नुकतीच नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत विविध विकासकामे आणि प्रशासकीय विषयांवर चर्चा सुरू असताना कत्तलखाना संदर्भातील विषयावरून विरोधी पक्ष भाजप आणि सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट)  आमनेसामने आले. कत्तलखाना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी तीव्र विरोध नोंदवत सभात्याग केला. यानंतर पालिका परिसरातही या विषयावर राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले.
सभेनंतर आमदार तथा नगराध्यक्षांचे पती चंद्रकांत रघुवंशी यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. नगरपालिकेच्या प्रस्तावाचा चुकीचा अर्थ लावून शहरवासीयांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्‍याचा आरोप यावेळी त्‍यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेल्या कायद्यानुसार गोवंश कत्तलीला स्पष्ट बंदी आहे. या कायद्याचा आम्ही पूर्ण आदर करतो. नगर पालिकेच्या प्रस्तावात गोवंशाचा कोणताही संबंध नाही. हा विषय म्हैस वंशासंदर्भातील असून केंद्र सरकारच्या नियमांनुसार ज्या बाबींना परवानगी आहे, त्याच चौकटीत नगरपालिकेने निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असे यावेळी आ. रघुवंशी म्‍हणाले.
भाजप नगरसेवकांच्या सभात्यागावरही त्‍यांनी कठोर शब्‍दात प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली. ते म्‍हणाले, स्थानिक भाजप नेत्यांनी केंद्र सरकारचे धोरण आणि कायदे आधी समजून घ्यायला हवेत. दिल्लीत एक आणि नंदुरबारमध्‍ये त्‍या विरोधातील दुसरीच भूमिका घ्‍यायची, अशी भाजपची भूमिका यापुढे खपवून घेतली जाणार नाही. विषयाचा सखोल अभ्यास न करता आणि ठरावाचा संपूर्ण मजकूर न वाचता विरोध करणे चुकीचे आहे. त्‍यांनी सभात्याग करण्यापेक्षा वस्तुस्थिती जाणून घेणे अधिक आवश्यक होते.
यावेळी त्यांनी भाजप नगरसेवकांच्या सभात्यागावर उपरोधिक टीकाही केली. सभात्याग केल्याबद्दल भाजपचे आभार. यापुढे त्यांनी प्रत्येक सभेपूर्वी वादग्रस्‍त वाटणारा विषय आधी आम्हाला सांगावा. आम्ही तो विषय अजेंड्यावर दुसऱ्या क्रमांकावर घेऊ, म्हणजे त्यांना सभात्यागासाठी जास्त वेळ थांबण्‍याची गरज त्‍यांना भासणार नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, भाजप मात्र कत्तलखाना विषयावर स्‍थानिक रहिवाशांच्‍या भावना दुखावल्या जात असल्याच्‍या आरोपावर कायम आहे. विरोधी पक्षनेत्यांसह भाजप नगरसेवकांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करत सत्ताधाऱ्यांवर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हा वाद केवळ पालिका सभेपुरता मर्यादित न राहता शहरातील प्रमुख राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.
विशेष म्हणजे या विषयावर विविध राजकीय पक्षांच्या भूमिकांमुळे आगामी स्थानिक राजकारणातही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावरही या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू असून समर्थक आणि विरोधकांकडून परस्परांवर टीकेची झोड उठवली जात आहे.
पालिका सभेतील या गदारोळानंतर कत्तलखाना विषय आता केवळ प्रशासकीय न राहता राजकीय रंग घेत असल्याचे चित्र दिसत आहे. आगामी काळात या मुद्द्यावर आणखी आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता असून नंदुरबारच्या राजकारणात हा विषय काही दिवस चर्चेचा केंद्रबिंदू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button