राजकारण

शिवसेनेकडून जि.प., पं.स. निवडणुकीची तयारी; आढाव्‍यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे शुक्रवारी नंदुरबारमध्‍ये; शिवसंवाद दौर्‍यात नंदुरबार, तळोद्यात घेणार बैठक

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शिवसेनेच्‍या एकनाथ शिंदे गटाने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तयारी सुरू केली असून, याच पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेनेचे नेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे शुक्रवारी (दि. ५) नंदुरबार जिल्‍ह्यात येत आहेत. राज्‍यव्‍यापी शिवसंवाद दौर्‍याचा भाग म्‍हणून डॉ. शिंदे नंदुरबार जिल्‍ह्यात विधानसभानिहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधणार असून, यावेळी शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी हेही त्‍यांच्‍यासोबत असतील.
शिवसेनेचे मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने संघटन बळकटीकरणावर भर दिला आहे. मुंबई आणि ठाणे लोकसभा क्षेत्रातील निवडणुकांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्‍यानंतर शिवसेनेचे संसदीय गटनेते तथा कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १६ मे पासून राज्‍यव्‍यापी शिवसंवाद दौरा सुरू केला आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत, सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी विधानसभा निहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्‍याशी या दौर्‍यात संवाद साधला जात आहे. १५ जुलैपर्यंत चालणाऱ्या या व्यापक दौऱ्यात राज्यातील २२ जिल्हे आणि १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघ श्रीकांत शिंदे पिंजून काढणार आहेत. खा. डॉ. शिंदे याच दौऱ्याच्या निमित्ताने शुक्रवारी (दि.५) नंदुरबार जिल्ह्यात येत असल्याची माहिती आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
या दौर्‍यात डॉ. शिंदे ५ जून रोजी सकाळी १० वाजता तळोदा येथे शहादा, तळोदा व धडगाव, अक्कलकुवा विधानसभा मतदार संघाची बैठक घेतील. दुपारी १ वाजता नंदुरबार येथे नंदुरबार व नवापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतील. त्यानंतर धुळ्याला प्रयान करतील.
सर्व प्रमुख कार्यकर्ते, शाखाप्रमुख, पक्षाचे बीएलओ, जि.प., पं.स. सदस्य, नगरसेवक यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन आ. चंद्रकांत रघुवंशी, आ.आमश्या पाडवी, शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख तथा माजी आ. शिरीष चौधरी, जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांनी केले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button