मुख्य बातम्या

गुड न्‍यूज : शेतकर्‍यांनो काळजी सोडा; देशभरात कमी पण महाराष्‍ट्रात पाऊस भरभरून बरसणार; अल-निनोचा प्रभावही कमी राहणार, मान्‍सूनची प्रगतीही चांगली

मुंबई / पुणे (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : कमी पावसाचा अंदाज आणि ‘एल-निनो’चा फटका बसण्‍याच्‍या चिंतेने हैराण असलेल्‍या महाराष्‍ट्रातील शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. यंदा देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसणार असला तरी महाराष्‍ट्राच्‍या पदरात मात्र पावसाचे भरभरून दान पडणार आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभाग (आयएमडी) ने यंदाच्या पावसाळ्याबाबत सुधारित अंदाज जाहीर केला आहे. देशात सरासरीच्या तुलनेत काहीसा कमी पाऊस पडण्याची शक्यता असली, तरी महाराष्ट्रासाठी हे चित्र अत्यंत दिलासादायक आणि आनंदाचे राहील, असे या सुधारित अंदाजात सांगण्‍यात आले आहे.
आयएमडीच्‍या या सुधारित अंदाजानुसार, २०२६ या चालू वर्षात देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) ९० टक्‍के पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्रात पावसाचा हाच टक्का मात्र तब्बल ९८ टक्‍के राहील. आयएमडीच्‍या या दिलासादायक अंदाजाने राज्यातील बळीराजाच्‍या चेहर्‍यावर हसू उमटण्‍यास मदत मिळणार आहे.
‘अल-निनो’बाबतही अनुकुल परिस्‍थिती

प्रशांत महासागरातील ‘अल निनो’च्या सक्रियतेमुळे देशाच्या काही भागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या ताज्या अहवालात वर्तविण्‍यात आला आहे. देशभरात अंदाजित पाऊस हा ‘सामान्‍यपेक्षा कमी’ वर्गवारीत मोडणारा ९० टक्‍के असेल. मात्र, प्रादेशिक हवामान प्रणाली आणि अरबी समुद्रातील अनुकूल स्थितीमुळे महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास सुखकर व दमदार असेल. हा पाऊस ९८ टक्‍के म्‍हणजेच ‘सामान्य पाऊस’ या वर्गवारीत मोडणारा असल्‍याने खरीप हंगामाच्या पेरण्यांसाठी ही अत्यंत सकारात्मक वेळ मानली जात आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाल्यास राज्यातील धरणांमधील पाणीसाठा सुधारण्यास मदत होईल, ज्यामुळे रब्बी हंगामाची चिंताही मिटू शकते. तसेच हवामान विभागाने दिलेल्या संकेतानुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांतही जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मान्‍सूनची वाटचाल चांगली
नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) केरळच्या जवळपास दाखल झाल्यानंतर आता ते उत्तर दिशेने सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. पुढील ४८ ते ७२ तासांत मान्सून कर्नाटकच्या किनारी भागात धडक देण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे, असे खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या अहवालात म्‍हटले आहे. तर भारतीय हवामान शास्त्र विभाग (आयाएमडी), तसेच मुंबई व पुणे प्रादेशिक हवामान केंद्र (आरएमसी) यांनी दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार, मान्सून अत्यंत वेगाने आणि अनुकूल परिस्थितीमध्ये पुढे सरकत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button