गुन्हे वार्ता

नंदुरबारमध्ये मंगळसूत्र चोरटे सुसाट; दुचाकीवरून आले अन सोनपोत हिसकावून झाले फरार; दोन महिन्यांतील तिसरी घटना; पोलिसांसमोर आव्हान

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरात धूम स्टाईल दुचाकीवर येत महिलांच्या सौभाग्यलेण्यावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, या चोरट्यांनी शहरातील आणखी एका वृद्ध महिलेची सोनपोत चोरून दोन चोरट्यांनी मोटारसायकलवरून धूम ठोकत पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांतील ही अशा स्वरूपाची तिसरी घटना आहे.
नंदुरबार शहरातील उर्मिला मुकुंदलाल अग्रवाल या ६८ वर्षीय वृद्धा सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान मंगलमूर्ती नगरातून पायी चालल्या होत्या. त्याचवेळी मागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी उर्मिलाबाई यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम ६०० मिलिग्रॅम वजनाच्या सोन्याची पोत हिसकावली. यामुळे उर्मिलाबाई गोंधळल्या. त्यांनी आरडाओरड केली. लोक त्यांच्या मदतीला धावून येण्याच्या आधीच क्षणार्धात चोरट्यांनी मोटारसायकल धूम स्टाईल पळवत धूम ठोकली.
नंतर उर्मिलाबाई अग्रवाल यांनी घडलेला प्रकार सांगत नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यावरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी हवालदार विजेंद्र वाडिले पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर रस्त्याने पायी फिरणाऱ्या महिलांच्या मनात चोरट्यांनी धास्ती निर्माण झाली असून, पोलीस या चोरट्यांचा बंदोबस्त करणार तरी कधी, असा प्रश्न नंदुरबारवासियांना पडला आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button