लुटारूंचा धुमाकुळ : नंदुरबारच्या सेल्समनला वावदनजीक दोन दुचाकीस्वारांनी लुटले; ५० हजारांचा ऐवज लंपास करून केला पोबारा
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : दुकानदारांकडून उधारी गोळा करून नंदुरबारकडे निघालेल्या मेडिकल सेल्समनला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लुटल्याची घटना नंदुरबार ते रनाळा रस्त्यावरील वावदनजीक घडली. यावेळी लुटारूंनी या सेल्समनच्या ताब्यातील सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथे मेडिकल सेल्समन म्हणून काम करणारे रवींद्र भटू पाटील यांच्याकडे परिसरातील औषधी दुकानदारांकडून उधारी गोळा करण्याची जबाबदारी होती. नेहमीप्रमाणे उधारी गोळा करून सोमवारी सायंकाळी उशीरा ८.३० ते ९ वाजेच्या दरम्यान नंदुरबारकडे परत येत होते. याचवेळी वावदनजीक रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना अडवून त्यांच्या गाडीपुढे आपले वाहन लावले. यावेळी त्या दोघांनी पाटील यांना धमकावून पैशांची मागणी केली. यानंतर त्या दोघांनी पाटील यांच्याकडील सॅकमध्ये ठेवलेले ३५ हजार रुपये रोख, काही धनादेश आणि एक टॅब असा एकूण ५० हजार ५४२ रुपयांचा ऐवज काढून घेत घटनास्थळावरून पोबारा केला.
घटनास्थळी अंधार आणि रस्ता सुनसान असल्याने पाटील यांच्या मदतीला कुणीही येवू शकले नाही. अखेर काही वेळाने पाटील यांनी नंदुरबार पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार कथन केला. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला. हवालदार संजय मनोरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.



