मद्य तस्करांवर नंदुरबार पोलिसांची ‘रेड’; ‘टीप’ मिळाली अन् ७.५ लाखांचे घबाड लागले हाती, दोघे ताब्यात
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमावर्ती भागात खुलेआम दारूची तस्करी सुरू असल्यावर आणखी एका घटनेवरून शिक्कामोर्तब झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातून गुजरातकडे जाणारा अवैध विदेशी दारूचा मोठा साठा नंदुरबार तालुका पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी वाहनासह दारू असा सुमारे साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांविरोधात गुन्ह दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यात दारूची अवैध तस्करी सुरू असून, जिल्ह्यातून दारूचा मोठा साठा एका वाहनातून अवैधपणे गुजरात राज्यात नेण्यात येत असल्याची माहिती नंदुरबार तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. याच दरम्यान कोरीट फाटा येथून एक वाहन येत असल्याचे पोलिसांच्या नजरेस पडले. पोलिसांनी हे वाहन (क्र. जीजे २६ यू ०१०८) अडवून तपासणी केली असता त्यात विदेशी दारूने भरलेले अनेक बॉक्स आढळले.
पोलिसांनी चौकशी केल्यावर वाहनचालक फैजल मोहम्मदभाई हारथी (रा. भावनगर, गुजरात) व त्याचा सहकारी जयेश राजेंद्र पाटील (रा. शिरपूर, जि. धुळे) या दोघांनाही समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. यामुळे पोलिसांनी वाहन ताब्यात घेउन पोलिस ठाण्यात आणून लावले. पोलिसांनी वाहन आणि विदेशी दारूचा साठा असा एकूण ७ लाख ४० हजार ८४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संबंधित दोघांवर विविध कलमान्वये नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश भदाणे, उपनिरीक्षक सुनील भामरे, जमादार सुनील सोनवणे, राजेंद्र धनगर, महेंद्र सोनवणे, सचिन सैंदाणे आदींनी ही कारवाई केली.



