गुन्हे वार्ता

शहादा तालुक्यातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले; महिना उलटला तरी शोध लागेना, पालक चिंताग्रस्‍त

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्यातील लोणखेडा येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शहादा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असला, तरी महिना उलटून जाऊनही अद्याप मुलीचा शोध लागलेला नसल्याने पालकांकडून चिंता व्‍यक्‍त होत आहे. दुसरीकडे, पोलिसांनी मात्र प्रकरणाचा तपास योग्‍य दिशेने सुरू असल्‍याचे स्‍पष्‍ट करीत मुलगी अल्‍पवयीन असल्‍याने यावर फारसे बोलता येणार नसल्‍याचे म्‍हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही शहादा तालुक्यातील लोणखेड येथे वास्तव्यास होती. ३० जानेवारी २०२६ रोजी पहाटे ३ वाजेच्‍या सुमारास ती अचानक घरातून बेपत्ता झाली. कुटुंबियांनी आसपासच्‍या परिसरात तसेच नातेवाईकांकडे चौकशी केल्‍यानंतरही ती न सापडल्‍याने अखेर मुलीच्‍या आईने अज्ञात व्यक्तीने मुलीला काही तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप करीत तशी फिर्याद शहादा पोलिस ठाण्‍यात दाखल केली.
या फिर्यादीनंतर शहादा पोलिसांनी अज्ञात व्‍यक्‍तीविरोधात गुन्‍हा दाखल केला. तसेच प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बेपत्ता मुलीचा शोध सुरू केला. मात्र, आता एक महिन्‍यापेक्षा जास्‍त कालावधी उलटल्‍यानंतरही अद्याप या मुलीचा शोध लागलेला नाही. यामुळे पोलिसांकडून प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असल्‍याचा आरोप होत आहे.
या संदर्भात ‘नंदुरबार पोस्‍ट’ने शहादा पोलिसांशी संपर्क साधला असता त्‍यांनी प्रकरणाचा तपास योग्‍य दिशेने सुरू असल्‍याचे सांगितले. तसेच मुलगी अल्‍पवयीन असल्‍याने अशा प्रकरणात अनेक स्‍वरूपाची काळजी घ्‍यावी लागते, असे सांगून यावर अधिक बोलणे उचित ठरणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button