नंदुरबार शहर

नगरसेविका झाल्‍यावरच शहराचा विकास करता येतो असे नाही : आ. रघुवंशी; पालिकेच्‍या महिला मेळाव्‍यात बचत गटांना धनादेश वितरण

नंदुरबार : (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नगरसेवक, नगरसेविका झाल्यावरच शहराचा विकास करता येतो, हे डोक्‍यातून काढून टाका. आपल्यातील कार्यकर्तृत्‍वाच्‍या जोरावरच विकास साधता येतो. हिंमतीलाच किंमत आहे. महिलांनी हिंमतीने व्यवसायात आत्मनिर्भर होऊन स्‍वत:सह शहराचा विकास घडवून आणला पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
नंदुरबार नगर परिषदेच्‍या वतीने महिला दिवस निमित्त रविवारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्‍या डोममध्ये मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ.रघुवंशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे बहिणींच्या सन्मान झाला. नंदुरबार जिल्ह्यात आज भगिनींच्या हातात खऱ्या अर्थाने सत्ता असून, विविध विभागांमध्ये त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटत आहे.
व्यासपीठावर नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, महिला व बालकल्याण सभापती शितल वसावे, शिक्षण सभापती भावना गुरव, नगरसेविका मनकुवर गिरासे, सोनिया राजपूत, चेतना वळवी, ज्योती राजपूत, वैष्णवी राजपूत, रेखा चौधरी, वंदना साळुंखे, लेखाधिकारी वैशाली जगताप, पं. दीनदयाळ योजनेचा राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान व्यवस्थापक मानसी मराठे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात गुणवंत महिलांच्या सत्कार नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
सन्मान आर्थिक प्रगतीचा
पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानातील पालिकेचा ६  बचत गटांना ४७ लाख ७५ हजार तर वैयक्तिक ७ लाभार्थ्यांना व्यवसायासाठी विविध बँकांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्यात आले. त्याचा धनादेश नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते देण्यात आले.
मेळाव्यात विविध उपक्रम
पालिकेतर्फे घेण्यात आलेल्या या मेळाव्‍यास शहरातील अनेक महिलांची उपस्थिती होती. यावेळी नवजात बालिकांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध स्‍पर्धांत सहभागी होऊन नंदनगरीचे नाव उज्वल करणाऱ्या विद्यार्थिनींना बक्षिसांचे वितरण करण्‍यात आले. तसेच शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला बचत गटाच्‍या सदस्यांचाही सन्‍मान करण्‍यात आला. यामुळे या महिला भाराऊन गेल्या होत्या. मेळाव्यात ’बेटी बचाव बेटी पढाव’ची शपथ उपस्थित महिलांना देण्यात आली. अभियानाची प्रस्तावना ज्योती पाठक यांनी केली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button