गुन्हे वार्ता

नंदुरबारमध्‍ये टोळक्‍याचा राडा : बाहेर खाद्यपदार्थ आणून देण्‍यास नकार देताच हॉटेल मालकासह तिघांवर खुनी हल्‍ला, एकाची मृत्‍यूशी झुंज

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरातील धुळे चौफुली ते नवापूर चौफुली दरम्‍यानच्‍या रस्‍त्‍यावरील एका हॉटेलात सोमवारी मध्‍यरात्रीच्‍या सुमारास जोरदार राडा झाला. जेवणाचे पदार्थ हॉटेलबाहेर आणून देण्‍यास नकार देणार्‍या हॉटेलमालकासह तिघांवर टोळक्‍याने सशस्‍त्र हल्‍ला करीत त्‍यांना जखमी केले. या तिघांपैकी एकाच्‍या डोक्‍यात लोखंडी रॉडने प्रहार करण्‍यात आला असून, सध्‍या त्‍याची मृत्‍यूशी झुंज सुरू आहे. या प्रकरणी ९ जणांवर नंदुरबार शहर पोलिस ठाण्‍यात खुनाच्‍या प्रयत्‍नाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय आत्‍माराम गवळी (३२, रा. धुळे रोड, जयंती नगर, नंदुरबार) यांचे नंदुरबार शहरातील धुळे चौफुली ते नवापूर चौफुलीदरम्‍यान राजपूत पेट्रोल पंपासमोर हॉटेल आहे. सोमवारी (दि. १६) रात्री दहा वाजेच्‍या सुमारास पराग राजेश रघुवंशी, प्रफुल्‍ल राजेश रघुवंशी, सूर्यकांत खंडू माळी, उमेश माळी (पाणीपुरीवाला / पूर्ण नाव माहिती नाही), जगदीश माळी, बापू गुरव, जयेश धनराज माळी, जीवन माळी तसेच आणखी एक जण (नाव माहिती नाही) असे ९ जण (सर्व रा. नंदुरबार) या हॉटेलच्‍या बाहेर उभे होते. त्‍यांनी अक्षय गवळी यांना जेवण्‍याची ऑर्डर दिली. यावर अक्षय यांनी जेवण करायचे असेल तर हॉटेलमध्‍ये येऊन बसून जेवण करा, आम्‍ही बाहेरून ऑर्डर केलेले जेवण हॉटेलच्‍या बाहेर आणून देत नाही, असे त्‍यांना सांगितले.
याचा वर उल्‍लेख केलेल्‍या बाहेर उभ्‍या असलेल्‍या सर्व आरोपींना राग आला. काही क्षणांतच त्‍यांनी अक्षय गवळी यांच्‍यासह त्‍यांचे वडिल आत्‍माराम गवळी, तसेच चुलत भाऊ मनोज श्रीलाल साबळे या तिघांना हॉटेलबाहेर काढून हॉटेल खान्‍देश जंक्‍शन एमएच ३९ या हॉटेलच्‍या बाजूला असलेल्‍या पाटील अमृततुल्‍य हॉटेलसमोर सार्वजनिक ठिकाणी त्‍यांना नेले.
तेथे त्‍यांच्‍यावर या टोळक्‍याने शस्‍त्रांनी प्राणघातक हल्‍ला चढवला. यापैकी अक्षय व आत्‍माराम गवळी यांना शिविगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करण्‍यात आली. तर आरोपी उमेश माळी याने मनोज साबळे याच्‍या डोक्‍यावर आपल्‍या हातातील लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केला. यात मनोज गंभीर जखमी झाला असून, सध्‍या त्‍याच्‍यावर रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. त्‍याची प्रकृती चिंताजनक आहे.
आता अक्षय गवळी यांच्‍या तक्रारीवरून सर्व ९ जणांवर बेकायदेशीर जमाव जमवून खुनाचा प्रयत्‍न केल्‍याप्रकरणी भारतीय न्‍याय संहितेच्‍या विविध कलमान्‍वये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पोलिस निरीक्षक निलेश देसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तानाजी बहिरम पुढील तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button