वाह रे चोरटा : चोरले काय तर म्हणे पातेले, ताट, परात, देवपुजेची थाळी अन् दोन गॅस सिलिंडर, आता दाखल झाला घरफोडीचा गुन्हा

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागात एका वृद्धाच्या घरात आणि मंदिरात एक अनोखी चोरी झाली. या छोट्याशा पण तितक्याच अनोख्या चोरीत चोरट्याने चक्क संबंधित वृद्धाच्या घरातून संसारोपयोगी साहित्य चोरून नेले. यामुळे या वृद्धाचा संसार उघड्यावर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश हरी टिल्लू (७१) यांचे संतांचे राममंदिर, देसाईपुरा, नंदुरबार येथे घर आहे. मात्र, सध्या त्यांचा मुक्काम सी-२७, सागर प्रसाद, गव्हाणपाडा, मुलुंड (पूर्व), मुंबई येथे असतो. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे नंदुरबारमधील घर बंदच होते. याचीच संधी हेरून अज्ञात चोरट्याने ६ ते १७ मार्चच्या दरम्यान कधीतरी त्यांच्या घरात व मंदिरात प्रवेश करून संसाराला उपयोगी पडेल, असे साहित्य चोरून नेले. यामध्ये एकात एक घातलेले ५ ते ६ पातेले, स्टीलची मोठी ताटे, परात, दोन गॅस सिलिंडर व शेगडी, ॲल्युमिनीयमचे भांडे, देवपुजेसाठी लागणारी पितळाची थाळी अशा एकूण ११ हजार रुपये किमतीच्या ऐवजाचा समावेश आहे.
या प्रकरणी मुकेश टिल्लू यांच्या तक्रारीवरून संबंधित अज्ञात चोरट्यावर नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र जाधव करीत आहेत.



