आधी ‘दारू’ची टेस्ट, पास झाले तरच एसटी बस चालवा थेट; ‘झिंगाट’ चालक-वाहकांना एसटी महामंडळाचा चाप, दोषी आढळल्यास होणार सेवा समाप्तीची कारवाई
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तर्राट होऊन बस चालवत प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणार्या चालक आणि वाहकांची ‘झिंग’ उतरवणारा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बस चालविणार्या चालकांसह वाहकांची यापुढे ड्युटी सुरू होण्याआधी अल्कोहोल टेस्ट (मद्यसेवन केले की नाही, याची चाचणी) केली जाणार आहे. संबंधित कर्मचार्याने कर्तव्यावर हजर होण्यापूर्वी मद्याचे सेवन केलेले असेल तर यापुढे त्याच्या हाती गाडीचे स्टेअरिंग दिले जाणार नाही, असा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
राज्य परिवहन महामंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे महामंडळाच्या बसने प्रवास करणार्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होणार असून, झिंगाट अवस्थेत या बस चालविणार्या चालकांना चाप बसणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाच्या धुळे विभागांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील चार आगार येतात. या चारही आगारातून शेकडो बस सोडल्या जातात. त्यासाठी अनेक चालक आणि वाहक कार्यरत आहेत. मात्र, यातील काही चालक आणि वाहक मद्यधुंद अवस्थेत सेवा देत असल्याच्या तक्रारी आगार प्रमुखांसह संबंधित अधिकार्यांकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने प्रत्येक चालक, वाहकाची दैनंदिन सेवा सुरू होण्यापूर्वी अल्कोहोल टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत आता चालक व वाहक ड्युटीसाठी एसटी आगारात येताच त्यांची मद्यसेवन चाचणी केली जाईल. ही चाचणी त्यांना स्वत:च करून घ्यावी लागेल. यात मशिनद्वारे त्यांच्या श्वासातील मद्याचे प्रमाण मोजले जाईल. संबंधित कर्मचारी सदरील चाचणीत उत्तीर्ण होत नाही, तोपर्यंत त्याला गाडीवर किंवा ड्युटीवर हजर करून घेतले जाणार नाही.
ड्युटीच्या काळातही होणार तपासणी
एसटी महामंडळाकडून या कर्मचार्यांची केवळ ड्युटीवर हजर करून घेतानाच नव्हे तर ड्युटी सुरू झाल्यानंतर अचानक कधीही अल्कोहोल टेस्ट केली जाणार आहे. यामध्ये बसस्थानक परिसर तसेच विश्रांतीगृहातही भरारी पथकांच्या माध्यमातून अचानक भेट देऊन ही तपासणी केली जाईल.
कायमची जावू शकते ड्युटी
अल्कोहोल टेस्टमध्ये दोषी आढळलेल्या कर्मचार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सर्वात प्रथम संबंधित अनुत्तीर्ण कर्मचार्याला त्याचक्षणी महामंडळातून निलंबित केले जाईल. एवढेच नाही तर अशा चाचणीत वारंवार दोषी आढळल्यास संबंधित कर्मचार्यावर कायमची सेवासमाप्तीसारखी टोकाची कारवाई देखील करण्याची तरतूद महामंडळाने केली आहे. शिवाय अल्कोहोल टेस्टिंग मशिनद्वारे केल्या जाणार्या चाचणीचा अहवाल महामंडळ डिजिटली सेव्ह करून ठेवणार आहे. प्रत्येक कर्मचार्याच्या सेवापुस्तिकेत त्याची नोंद केली जाईल. भविष्यात शिस्तभंगाची कारवाई करताना या नोंदींचा वापर करता यावा, असा यामागील उद्देश आहे.



