वाह रे भामटा : चक्क बनावट विमा पॉलिसी विकून तळोद्यातील ट्रकचालकाला ३४ हजारांना गंडा; बिंग फुटताच लागला जीवे मारण्याच्या धमक्या द्यायला
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहाद्यातील एकाने विमा एजंट असल्याचे भासवून चक्क बनावट पॉलिसी तयार करून तिची विक्री करीत ट्रकचालकाला सुमारे ३४ हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे विमा पॉलिसी बनावट असल्याचे बिंग फुटताच या भामट्याने संबंधित ट्रकचालकाला शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकीही दिली. आता या भामट्याविरोधात तळोदा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप जयसिंग राजपूत (३९, रा. बोरद, ता. तळोदा, जि. नंदुरबार) हे ट्रकचालक असून, त्यांना त्यांच्याकडील ट्रकची (क्र. एमएच १८ एम ७६९७) साधारण विमा पॉलिसी (जनरल इन्शुरन्स) काढायची होती. याच काळात सतीश राजेंद्र चित्रकथे (रा. मुरलीमनोहर कॉलनी, मलोनी, ता. शहादा, जि. नंदुरबार) याच्याशी त्यांचा संपर्क झाला. चित्रकथे याने आपण इन्शुरन्स एजंट असल्याचे सांगून चोलामंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनीची विमा पालिसी काढून देण्याचे काम करून देण्याची थाप राजपूत यांना मारली. राजपूत यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून ट्रकची एका वर्षासाठीची विमा पॉलिसी काढण्याचे काम चित्रकथे याला सोपवले. या पॉलिसीचा हप्ता ३४ हजार २६० रुपये सांगण्यात आला. यातील १४ हजार रुपये ७ नोव्हेंबर २०२४ रोजी फोन पे द्वारे तर उरलेले २० हजार २६० रुपये दुसर्या दिवशी रोख स्वरूपात राजपूत यांनी चित्रकथे याला दिले. ठरल्यानुसार चित्रकथे याने सदरील कंपनीची विमा पॉलिसी राजपूत यांना सोपवली.
मात्र, पुढे चौकशी केल्यावर सदरील पॉलिसी बनावट असल्याचे समजताच राजपूत यांना भोवळ येणेच बाकी राहिले. त्यांनी तातडीने चित्रकथे याच्याशी संपर्क साधला. मात्र, तो त्यांना टाळू लागला. राजपूत फारच मागे लागल्यानंतर चित्रकथे याने त्यांना शिविगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देणे सुरू केले.
अखेर राजपूत यांनी गुरुवारी (दि. १९) तळोदा पोलिस ठाणे गाठून सतीश चित्रकथे याच्याविरोधात फसवणूक करून पैसे लाटल्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदवली. त्यानुसार चित्रकथे याच्यावर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ३३५, ३३६ (२), ३५१ (२), ३५२ अन्वये गुन्ह्याची नोंद केली. पोलिस उपनिरीक्षक महेश निकम हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



