गुन्हे वार्ता

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नोकरीच्या आमिषाने गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १७ जणांकडून ३.१६ लाख उकळले, एकाच्‍या तक्रारीने भांडे फुटले, दोघांवर गुन्‍हा!

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळून बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. एका तरुणाच्या तक्रारीनंतर सतरा जणांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर पुन्हा दाखल झाला असून, त्यांच्या चौकशीतून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या सुरू आहेत. याची माहिती असलेल्या काही जणांनी या रुग्णालय व महाविद्यालयातील अधिकाऱ्यांच्या ओळखीचा फायदा घेत बेरोजगारांना गंडवण्याचा धंदा सुरू केल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. आता नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दोघांवर दाखल गुन्हा दाघल झाल्यामुळे यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. जिल्हा रुग्णालयासमोरच्या हॉटेलमधील दोघांनी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन आपल्यासह एकूण १७ जणांची फसवणूक केल्याचे या तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे.
काय आहे प्रकरण
सुरज भरत गावित (२२, रा. घोगळपाडा, ता. नवापूर, जि. नंदुरबार) या तरुणाने ही फिर्याद नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. कृष्णा चिंतामण गावित व मनोज जालमसिंग गावित ( दोघेही रा. टोकरतलाव, ता. व जि. नंदुरबार) या दोघांनी ‘आम्ही तुला नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात सफाई कामगार म्हणून नोकरी लावून देतो त्यासाठी पैसे द्यावे लागतील’, असे सांगत सुरजची कागदपत्रे ठेवून घेतली. यानंतर सुरज यांनी ९ डिसेंबर २०२५ रोजी कृष्णा गावित याला रुग्णालयासमोरील हॉटेलवर जाऊन १७ हजार रुपये दिले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ८. ३० वाजता फिर्यादीने पत्नीच्या नोकरीसाठी आणखी १७ हजार रुपये हॉटेलवर जाऊन त्याला दिले. यावेळी ८ जानेवारी २०२६ रोजी नोकरीची ऑर्डर शासकीय रुग्णालयात मिळून जाईल, असे सुरजला सांगण्‍यात आले.
सुरज व त्याची पत्नी दवाखान्यात गेल्यानंतर त्यांना ऑर्डर मिळाली नाही. काही दिवस वाट पाहिल्यानंतर सुरज व त्याची पत्नी २० जानेवारीला ऑर्डर घेण्यासाठी पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात गेले. यावेळी त्यांना कृष्णा व मनोज गावित या दोघांनी आपल्याप्रमाणेच १७ जणांना नोकरीचे आमिष दाखवून सर्वांकडून मिळून एकूण ३ लाख १६ हजार रुपये उकळले असल्याची माहिती मिळाली. यामुळे हादरलेल्या सुरज गावित यांनी काही दिवस वाट पाहिल्यानंतर अखेर ७ एप्रिल रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात फिर्याद नोंदवली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तानाजी बहिरम हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button