शहाद्यात ‘पंचनामा’ : विधिमंडळ समितीकडून आश्रम शाळा व ग्रामीण रुग्णालयाची झाडाझडती; सुविधांवर नाराजी, सुधारणा करण्याच्या सूचना

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्य विधिमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर दाखल झाली असून, बुधवारी (ता. ८) या समितीने शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील आश्रम शाळा, कोचरा येथील अनुदानित निवासी आश्रम शाळा तसेच शहादा ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करत सखोल झाडाझडती घेतली. यावेळी शैक्षणिक व आरोग्य सुविधांबाबत आढळलेल्या त्रुटींवर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
आदिवासी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावी ठरते आहे, तसेच त्या योजनांचा लाभ खरोखरच पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहे का, याची पडताळणी करण्यासाठी समितीचा ७ ते १० एप्रिलदरम्यान नंदुरबार जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. ही समिती बुधवारी शहादा तालुक्यात दाखल झाली. या समितीत गट क्रमांक दोनचे गटप्रमुख आ. शांताराम मोरे, आ. राजेश पाडवी, आ. रामदास मसराम, आ. मंजुळा गावित आणि आ. हिरामण खोतकर यांचा समावेश आहे.
समितीने सर्वप्रथम सुलतानपूर येथील आश्रम शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेतील निवास व्यवस्था, स्वच्छता, भोजन व्यवस्था तसेच शैक्षणिक सुविधांची पाहणी करताना काही बाबी अपुऱ्या असल्याचे निदर्शनास आले. यावर सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारत तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर कोचरा येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळेला भेट देण्यात आली. येथे वर्गखोल्या, विद्यार्थ्यांची वसतिगृह व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता आदी मूलभूत सुविधांची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांकडे अधिक लक्ष देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
दरम्यान, समितीने शहादा येथील ग्रामीण रुग्णालयालाही भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला. औषधांचा साठा, वैद्यकीय साधनसामग्री, तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत रुग्णांशी थेट संवाद साधण्यात आला. काही त्रुटी आढळल्याने समितीने नाराजी व्यक्त करत रुग्णालयात आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवावा, रुग्णांना २४ तास तत्पर सेवा मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या. विशेषतः रात्रीच्या वेळेतही सेवा सुरळीत सुरू राहण्यावर समितीने भर दिला.
समितीच्या या पाहणीमुळे शहादा तालुक्यातील आश्रम शाळा व आरोग्य यंत्रणेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, संबंधित विभागांनी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही मत व्यक्त केले जात आहे.



