नंदुरबारमध्ये ‘वर्दी’ संकटात : भांडण टाळण्यासाठी गेलेल्या पोलिसासह होमगार्डला जमावाकडून बेदम मारहाण; ठाणेपाडा गावात खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारले!

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मुलगी पळवण्याच्या कारणावरून होत असलेला वाद आणि भांडण शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिस हेडकॉन्स्टेबलसह होमगार्ड जवानाला जमावाने घेरून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार तालुक्याच्या ठाणेपाडा गावात मंगळवारी(दि. १४) भल्या पहाटे घडली. यामध्ये हेड कॉन्स्टेबल रमेश टेट्या कडवे आणि होमगार्ड विजय पवार गंभीर जखमी झाले आहेत. जमावाने चक्क ‘वर्दी’वर टाकण्याची हिंमत केल्याने पोलिस दलासह सर्वांनाच धक्का बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणेपाडा गावातील एका मुलीचे अपहरण करण्यात आले होते. यावरून गावात तणाव निर्माण झालेला होता. या विषयावरून गावात वाद आणि भांडण होण्याचा संशय पोलिसांना होता. यामुळे नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल रमेश टेट्या कडवे हे विजय पवार या होमगार्ड जवानाला सोबत घेऊन शासकीय कर्तव्य बजावण्यासाठी मंगळवारी भल्या पहाटे ठाणेपाडा गावात पोहोचले होते.
कडवे व पवार गावात पोहोचले त्यावेळी एक जमाव हनुमान मंदिराजवळ बेकायदेशीरपणे एकत्र येऊन जयसिंग गजमल पवार याला घेऊन दमबाजी करत होते. महेंद्र गायकवाड याला आमच्या ताब्यात दे अशी मागणी जमावातील मंडळी जयसिंग पवार याच्याकडे करत होते. यावेळी कडवे यांनी मध्यस्थी करत जमावाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. भांडण करू नका घरी निघून जा, अशी विनंती कडवे यांनी करताच जमावतील लोकांनी त्यांना ‘तुम्ही निघून जा आम्ही आमचे पाहून घेऊ’,असे स्पष्ट शब्दात सुनावले. यावर कडवे यांनी पुन्हा जमावाला भांडण टाळण्याची विनंती केली.
मात्र, याच दरम्यान आरोपींनी होमगार्ड विजय पवार यांना धक्का दिला. कडवे हे पवार यांना सांभाळत असतानाच आरोपींनी त्यांना धमकी देऊन त्यांचा गणवेश फाडला. तसेच खाली पाडून धोका या शिपायाला असे इतरांना सांगत आरोपींनी कडवे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. शिवाय विजय पवार यांच्या हातातील फायबरची काठी हिसकावून तोडून टाकली आणि शेजारी असलेल्या रसवंती वरून ऊस घेऊन त्यांच्या डोक्यावर, पाठीवर, पायांना व उजव्या हाताच्या मनगटावर जोरदार प्रहार केले यामध्ये पवार जखमी झाले. यावेळी जमावाच्या हातात दगड विटा पाहून अखेर कडवे व पवार यांना त्या ठिकाणाहून काढता पाय घ्यावा लागला.
अखेर पोलिस ठाण्यात परत आल्यावर रमेश कडवे यांनी फिर्याद दाखल केली. सागर ईश्वर ठाकरे आकाश ईश्वर ठाकरे दादा झुरू ठाकरे भरत उर्फ गुड्ड्या (पूर्ण नाव माहिती नाही), एक लाल टी-शर्ट घातलेला मुलगा (नाव, गाव माहित नाही) तसेच त्याच्या इतर साथीदारांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, १२१ (१), २२१, १८९ (१), १८९ (२), १८९ (५) व १९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सुरेश चौरे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



