महाराष्ट्र

‘ओसाडगावच्या पाटीलकी’ची माळ कुणाच्या गळ्यात?; काँग्रेसच्या नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदासाठी २४ जण इच्छुक, १५ दिवसांत होणार अंतिम निर्णय

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून उतरती कळा लागलेल्या आणि गेल्या सहा वर्षांपासून ‘कॅप्टन’ शिवाय भरकटत असलेल्या काँग्रेस नावाच्या जहाजाला अखेर लवकरच नवा जिल्हाध्यक्ष मिळण्याचे संकेत मिळू लागले आहेत. पक्षाचा जिल्हाध्यक्ष होण्यासाठी तब्बल २४ जण इच्छुक असून यापैकी कुणाच्या गळ्यात या पदाची माळ पडते,  याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
गेल्या बारा वर्षांपासून काँग्रेसला नंदुरबार जिल्ह्यात उतरती काळा लागली असून, सध्या जिल्ह्यात हा पक्ष म्हणजे ओसाड गाव बनला आहे. कधी गाडी नंदुरबार जिल्हा आणि काँग्रेस यांची ओळख ‘एक दुजे के लिए’ अशी करून दिली जायची. हा जिल्हा सुरुवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला होता. देशासह राज्यात अनेकदा अनेक लाटा आल्या. परंतु या जिल्ह्याने काँग्रेसची साथ कधी सोडली नव्हती. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापासून गांधी परिवारातील सर्वच नेत्यांचे या जिल्ह्यावर विशेष प्रेम राहिले आहे. खा. सोनिया गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर पहिली सभा नंदुरबार जिल्ह्यातच घेतली होती. जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा चारही जागांवर पक्षाचे उमेदवार निवडून येत. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था ही याच पक्षाच्या ताब्यात होत्या.
मात्र, २०१४ ला सुरू झालेल्या ‘मोदी पर्वा’पासून हे चित्र बदलले. आता तर जिल्ह्यात केवळ एकच आमदार या पक्षाचा निवडून येऊ शकला आहे. तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीत बदलाचा वारा सुरू असल्याने काँग्रेसचा खासदार निवडून येऊ शकला. एवढेच काय ते सध्या जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व दिसते.
लवकरच मिळणार जिल्हाध्यक्ष
आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून या पक्षाला जिल्हाध्यक्ष नाही. गेल्या काही दिवसांपासून पक्षाचे एकमेव आमदार शिरीष नाईक प्रभारी म्हणून हे पद सांभाळत आहेत. मात्र, आता पक्षाचे निरीक्षक अखिलेश शुक्ला ‘संघटन सृजन अभियान’च्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष पदासाठी मुलाखती घेत आहेत. जिल्ह्यातून तब्बल २४ जण या पदासाठी इच्छुक असून, यापैकी कुणाला हे पद मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, काँग्रेसचे ‘संघटन सृजन अभियान’ शहाद्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी अखिलेश शर्मा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक व पंचायत राज समन्वयक अनिल पाटील, जावेद फारुख, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, नंदुरबार जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष दिलीप नाईक, किसान सेल अध्यक्ष देवा चौधरी, जि.प.चे माझी उपाध्यक्ष सुहास नाईक, शहादा- तळोदा चे माजी आमदार राजेंद्र गावित, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश पाटील यांच्यासह आजी-माजी जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध सेलचे पदाधिकारी तसेच तालुका स्तरावरील कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पटेल यांनी केले. तर प्रस्तावना दिलीप नाईक यांनी मांडली.
हे आहेत इच्छुक…
राजेंद्रकुमार गावित, सुहास नाईक, पंडितराव पवार, खंडेराव पवार, सुरेश साळुंखे, दत्तू पवार, सचिन रहासे, विश्वनाथ वळवी, अशोकराव पाटील, राकेश पावरा, सुभाष पाटील, राजेंद्र पाटील, अशोक वळवी, रोशन गावित, कश्मिरा बोरसे, मोहम्मद अ. सहमद, हारून इस्माईल खान, ऍड. जोमीखान पठाण, दिलीप नाईक देवा भाई चौधरी दीपकभाई पटेल, निखिल रघुवंशी हे २४ जिल्हाध्यक्ष होण्यासाठी उत्सुक आहेत. आता या सर्वांच्या पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात मुलाखती पार पडतील आणि त्यानंतर पुढील पंधरा दिवसात पक्षाच्या नव्या जिल्हाध्यक्षाच्या नावाची घोषणा होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button