नांदरखेडात एकाच रात्री चार घरे फोडली; लाखोंचा ऐवज लंपास; परिसरात दहशत, सारंगखेडा पोलिसांपुढे चोरट्यांचे आव्हान

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अज्ञात चोरट्यांनी सारंगखेडा पोलिसांना आव्हान देत नांदरखेडा (ता.शहादा) येथे एकाच रात्री चार घरे फोडली. यात लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला असून, त्यात एका कुलुपबंद घरातून सुमारे साडे तीन लाख रुपयांच्या ऐवज चोरून नेल्याची घटना (ता.१४) ला उघडकीस आली आहे. दरम्यान, एकाच रात्री चार घरांमध्ये चोरटे शिरल्याने ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण पसरले असून चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान सारंगखेडा पोलिसांसमोर आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदरखेडा (ता.शहादा) येथील मोतीलाल विठ्ठल पाटील (७०, व्यवसाय शेती) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातून लोखंडी कपाटातील सुमारे एक लाख रुपये रोख आणि अंदाजे अडीच लाख रुपये किंमतीचे ५० ग्रॅम वजनाचे वडिलोपार्जित सोन्याचे दागिने (बांगड्या, पाटल्या व अंगठ्या) असा एकूण तीन लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. याच रात्री परिसरातील तुंबा भुला पाटील, सुनील गिरासे व शरद पाटील अशा तीन जणांकडेही घरफोडी झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे दिसून आले.
या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात मोतीलाल विठ्ठल चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा क्रमांक ११०/२०२६ नुसार भा.न्या.सं. २०२३ च्या कलम ३०५(अ), ३३१(२)(४), ६२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहेत.
चोर्या वाढल्या…
गेल्या आठवड्यात सारंगखेडा गावातच धाडसी चोरी झाली होती. त्यात अज्ञात चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात घरातील महिला गंभीर जखमी झाली होती. या घटनेला आठवडा होत नाही तोच पुन्हा चोरट्यांनी एकाच रात्री तीन ते चार घरे फोडून पोलिसांना आव्हान दिले. सारंगखेडा व परिसरात चार्यांचे प्रमाण वाढले असून, पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.



