मुख्य बातम्या

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, तब्‍येत सांभाळा! : उष्‍माघाताचे दोन बळी; नांदेडात ४७ तर अकोल्यात पारा ४४ अंशावर, तीन दिवस धोक्‍याचे, नंदुरबारचे तापमान किती, वाचा…

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : राज्यात तापमानाचा पारा दिवसाकाठी वाढतच असुन, अनेक जिल्ह्यात तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे. नांदेडच्‍या देगलूर तालुक्यातील सुंदगी गावात तब्‍बल ४७ अंश तापमानाची नोंद झाली असून, सुंदगी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. सध्‍या चर्चेत असलेल्‍या अकोल्‍यातही पारा ४४.२ अंशांवर पाहोचला असून, नंदुरबार जिल्‍ह्यातही तापमान ४० अंशांच्‍या पुढे सरकले आहे. वाढत्‍या उन्‍हाने विदर्भात आतापर्यंत दोन बळी घेतले असून, राज्‍यात पुढील तीन दिवस उष्‍णतेची लाट राहणार असल्‍याने राज्‍य सरकारने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
अकोल्यात या मोसमातील सर्वात जास्त ४४.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात तापमानाचे दररोज नवनवे उच्चांक पाहायला मिळत असुन, या जिल्‍ह्यात ९ एप्रिलला ३८.७ अंश सेल्‍सियस असलेला पारा १५ एप्रिलला थेट ४४.२ अंशांवर पाहोचला. याचा अर्थ अकोल्‍यातील पारा गेल्‍या सात दिवसांत ५.५ अंशांनी वाढला आहे. पुढचे काही दिवस अकोल्यात तापमानाचे अनेक नवे उच्चांक होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे.
उष्माघाताचे दोन बळी
वाढत्या उन्हाने विदर्भात आतापर्यंत दोन बळी घेतले आहेत. यात अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.  वाशिमच्या अनसिंग परिसरात एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर आढळला तर अकोल्यात रिक्षा चालकाचा मृतदेह त्याच्या रिक्षातच आढळला. या दोघांचाही मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे.
नंदुरबारचा पारा आज ४२ अंशावर जाणार
नंदुरबार जिल्ह्यातही उष्णतेची लाट आली असून, काल बुधवारी  (दि. १५) जिल्ह्यात शहादासह बहुतांश ठिकाणी ४१ अंश तापमानाची नोंद झाली. आज गुरुवारी तापमानाचा पारा ४२ अंशांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरबार वाढत्या उन्हामुळे नंदुरबार शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी कर्फ्यूसदृश स्थिती दिसत असून दुपारच्या वेळी रस्त्यांवर अक्षरश: शुकशुकाट जाणवत आहे.
यलो अलर्ट, काळजी घेण्याचे आवाहन
वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी १६ ते १८ एप्रिल दरम्यान यलो अलर्ट जारी केला असून राज्यात या कालावधीत उष्णतेची लाट राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. जिल्हा प्रशासनांनी उष्माघातापासून बचावासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून या काळात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button