बापाचा मर्डर : मशीन विक्रीला विरोध केला म्हणून डोकं सटकलं अन् वडिलांनाच ठार केलं!; अक्कलकुवा तालुक्यातील भयानक घटना
अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : हात शिलाई मशीन विक्रीसाठी विरोध करणाऱ्या वडिलांना त्याच मशीनचे वार करून कायमचे संपवण्यात आल्याची धक्कादायक घटना मोलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरागव्हाण (कोदलापाडा) नजीक घडली. खुनानंतर आरोपी मुलगा रमेश वसंत वसावे फरार झाला असून, मोलागी पोलिसांनी त्याच्या शोधात पथके रवाना केली आहेत.
या धक्कादायक घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत आरशी वसावे (५५, रा. उमरागव्हाण कोदलापाडा ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मुलगा रमेश वसावे (३०) हा बुधवारी (दि. १५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरातील हातशिलाई मशीन विक्री करण्यासाठी घेऊन जात होता. यावेळी उमरागव्हाण ते कोदलापाडा दरम्यान कच्च्या रस्त्यावर वडील वसंत वसावे यांनी त्याला अडवले. यावेळी संतापलेल्या रमेश आणि वसंत यांच्यात झटापट सुरू झाली. हा वाद वाढून रमेशने संतापाच्या भरातच तीच मशीन वडील वसंत यांच्या डोक्यावर व पाठीवर मारून त्यांना गंभीर जखमी केले. रमेशने केलेले वार वर्मी बसल्याने वसंत वसावे तडफडत खाली पडले आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना माहिती झाल्यानंतर रमेशची आई टेडूबाई व इतरांनी वसंत वसावे यांना दवाखान्यात नेले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. दरम्यान, टेडूबाई वसंत वसावे यांच्या तक्रारीवरून त्यांचा मुलगा रमेश वसंत वसावे याच्या विरोधात मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रमेश घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याच्या शोधार्थ पोलिसांचे पथकरवाना झाले आह. आता मोलगीचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक पावरा या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



