नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नव्या ‘प्रकाशवाटा’; स्पर्धा परीक्षेतील यशासाठी जिल्हा प्रशासन दाखवतेय नवी दिशा!

(नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : आदिवासी विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांकडे वळविण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने पथदर्शी पाऊल उचलत प्रकाशवाटा हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्यास कचरत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना या मार्गावर चालण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या संकल्पनेतून प्रशासन हा उपक्रम राबवित आहे.
सर्वांत आधी या उपक्रांतर्गत जिल्ह्यातील २०० पैकी १०० विद्यार्थ्यांची या प्रकल्पासाठी निवड करण्यात येईल. त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक नियोजनबद्ध मार्गदर्शन करून पुढच्या प्रवासाची तयारी करून देण्यात येईल. यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही अशाच पद्धतीने निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत निवासी सुविधा उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील निवडक आश्रमशाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात कोठली, नंदुरबार, नवापूर येथील शाळांचा समावेश आहे.
राज्यातील नामांकित स्पर्धा परीक्षा अकादमींची निवड करून त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन दिले जाईल. या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे आत्मविश्वास निर्माण होऊन विद्यार्थी प्रशासन, पोलिस, बँकिंग आदी क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, या उपक्रमांतर्गत रविवारी नंदुरबार येथे डॉ. कान्हे गर्ल्स हायस्कूल व डी.आर, हायस्कूल, तर तळोदा तालुक्यातील न्यू हायस्कूल, शेठ के.डी हायस्कूल व नेमसुशील विद्यामंदिर या ठिकाणी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. जिल्हाधिकारी शेट्टी यांनी स्वत: या परीक्षा केंद्रांवर भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अनय नावंदर, गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, तर नंदुरबार येथे निवासी जिल्हाधिकारी आशा सांगवी, नंदुरबारचे तहसीलदार शिवांश सिंग, निर्मल माळी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रकाशवाटा उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे या विद्यार्थ्यांना प्रशासन, पोलिस व इतर क्षेत्रात करिअर करण्याचे नवे मार्ग खुले होतील. पहिल्या टप्प्यातील यशस्वी विद्यार्थ्यांमुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास वाटतो.
– डॉ. मिताली सेठी (जिल्हाधिकारी, नंदुरबार)



