नंदुरबारमध्ये कोल्ड्रिंक्सच्या दुकानात सुरू होती गुटखा विक्री; ‘अन्न औषधी’च्या पथकाने केला पर्दाफाश, १४ हजारांचा मुद्देमाल जप्त
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : वेगवेगळ्या क्लृप्त्या करून सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीविरोधात अन्न व औषधी प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. यावेळी अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने नंदुरबार शहरात थंडपेय विक्रीच्या नावाखाली सुरू असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूच्या विक्रीचा पर्दाफाश करीत तब्बल सुमारे १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील अली साहब मोहल्ला भागातील मेमन कोल्ड्रिंक्स या दुकानात थंडपेयांसोबतच प्रतिबंधित गुटखा पान मसाला व सुगंधी तंबाखूची विक्री सुरू असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या नंदुरबार कार्यालयाला मिळाली होती. त्यानुसार या विभागाने सापळा रचून ३० एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास या दुकानावर छापा टाकला. यावेळी पथकाला या ठिकाणी गुटखा व पानमसाल्याची विक्री सुरू असल्याचे आढळले. यानंतर पथकाने विमल, व्ही १, तानसेन, डायरेक्टर, तुलसी, रजनीगंधा, करमचंद, केसी जाफरानी, शॉट लक्झरी, झेड एन १ जपानी जर्दा आणि या पान मसाल्यासोबत दिली जाणारी सुगंधित तंबाखू यांची पाकिटे असा १३ हजार ९८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी तुषार देवरे यांच्या तक्रारीवरून नोमान इरफान शेख (२३) याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता आणि अन्नसुरक्षा व मानके कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली विजय वसावे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



