गुन्हे वार्ता

शहाद्यात गांजाच्‍या तस्‍करीचा पर्दाफाश; दुचाकीवरून सुरू होती वाहतूक; रात्री उशीरा कारवाई, तब्‍बल ४.८१ लाखांच्‍या गांजासह धुळ्‍याच्‍या दोघांना बेड्या!

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : धडगावहून शहादा तालुक्‍यातील असलोदमार्गे धुळे जिह्यातील शिरपूरकडे दुचाकीवरून वाहतूक केला जाणारा गांजाचा मोठा साठा पकडण्‍यात शहादा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात शहादा पोलिसांनी दामळदा ते असलोद रस्‍त्‍यावर सापळा रचून धुळे जिल्‍ह्यातील दोघांना बेड्या ठोकल्‍या असून, त्‍यांच्‍याकडून तब्‍बल सुमारे चार लाख ८१ हजार २८० रुपये किमतीचा गांजाचा साठा जप्‍त करण्‍यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शहादा पोलीस ठाण्‍याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी गुप्‍त खबर्‍याकडून दोन व्‍यक्‍ती १५ मे रोजी रात्री मोटारसायकलवरून शहादा पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील असलोद दूरक्षेत्र मार्गाने शिरपूरकडे गांजाचा मोठा साठा घेऊन जाणार असल्‍याची माहिती मिळाली होती. पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने असलोद-दामळदा रस्‍त्‍यावरील एका संस्‍थानजवळ आपले सहकार्‍यांच्‍या मदतीने रात्री उशीरा सापळा रचला.
एका गेटजवळ पोलिसांचे पथक आणि पंच थांबले असतानाच रात्री उशीरा दोघे जण एमएच ०३ बीके ७५११ या क्रमांकाच्‍या लाल रंगाच्‍या दुचाकीवरून मोठ्या बॅगा घेऊन येताना दिसले. या वाहनासह सावज टप्‍प्‍यात येताच पोलिसांच्‍या पथकाने झडप घालून दोघांच्‍याही मुसक्‍या आवळल्‍या. सुशील सुमा पावरा (३०) आणि गजेंद्र जितेंद्र पावरा (२१, दोघेही रा. मोहिदे, ता. शिरपूर, जि. धुळे) अशी या दोघांची नावे आहेत. पोलीस पथकाने त्‍यांच्‍याकडील बॅगांमध्‍ये काय आहे, याची चौकशी केली असता त्‍यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. तसेच या दोघांकडे गांजाची वाहतूक किंवा विक्री करण्‍याचा कोणताही परवाना देखील नव्‍हता. यामुळे पोलिसांचा संशय वाढला आणि त्‍यांनी या दोघांकडील एक झोळी व दोन बॅगांची तपासणी केली असता त्‍यात तब्‍बल २० किलो ५६४ ग्रॅम सुका गांजा आढळला. या गांजाची बाजारातील किंमत तब्‍बल ४ लाख ८१ हजार २८० रुपये इतकी आहे.
पोलिसांनी या दोघांना ताब्‍यात घेतले असून, त्‍यांच्‍यावर अटकेची कारवाई करण्‍यात आली आहे. आज, शनिवारी (दि. १६) दुपारनंतर न्‍यायालयासमोर हजर करण्‍यात येणार आहे. दरम्‍यान, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, सहायक निरीपक संदीप वाघ, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक कोळी, पोहेकॉ बहादुर भिलाला, पोशि भगवान सावळे, कपिल मंदिल, विकास शिरसाठ, भरत शिंपी, मिथुन सिसोदे आदींच्‍या पथकाने ही कारवाई केली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button