गुन्हे वार्ता

कुंपणच शेत खाते तेव्‍हा… : दोन मुख्‍याध्‍यापकांनीच मारला शाळेच्‍या २३७ किलो तांदळावर डल्‍ला; नंदुरबारमधील दोन उर्दू प्राथमिक शाळांतील धक्‍कादायक प्रकार

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरातील दोन उर्दू शाळांमध्‍ये कुंपणानेच शेत खाल्‍ल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या शाळांच्‍या मुख्‍याध्‍यापकांनीच शाळेतील मुलांच्‍या पोषण आहारासाठी आलेला तब्‍बल २३७ किलो ५०० ग्रॅम तांदूळ विक्रीच्‍या उद्देशाने विनापरवानगी शाळेबाहेर नेऊन अपहार केल्‍याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी दोन्‍ही मुख्‍याध्‍यापकांवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
नंदुरबार शहरातील अल्‍हाज काझी चिरागोद्दीन उर्दू प्राथमिक शाळा आणि अँग्‍लो उर्दू हायस्‍कूल या दोन्‍ही शाळांमध्‍ये हा प्रकार घडला आहे. फय्‍याझ खान मुनाफ खान व काझी सलाउद्दीन अलीओद्दीन अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शाळेतील मुलांच्‍या पोषण आहारासाठी सरकारकडून देण्‍यात आलेल्‍या वस्‍तू शिक्षण विभागाच्‍या वरिष्‍ठांच्‍या परवानगीशिवाय शाळेच्‍या आवाराच्‍या बाहेर नेता येत नाहीत. याची माहिती असताना या दोन्‍ही शाळांच्‍या मुख्‍याध्‍यापकांनी अधिकाराचा गैरवापर करून विनापरवानगी शाळेतील तांदूळ गोण्‍या व इतर पिशव्‍यांतून रिक्षात (क्र. एमएच १९ जेजे ४४४८) भरून शाळेबाहेर नेल्‍याची तक्रार दाखल झाली होती. शिक्षण विभागाने याबाबत तथ्‍याची पडताळणी केली असता तक्रार खरी असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.
यानंतर शालेय पोषण आहार योजनेचे अधीक्षक शरद नथ्थू पाटील यांनी दोन्‍ही मुख्‍याध्‍यापकांच्‍या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्‍यात फिर्याद दाखल केली. त्‍यावरून गुन्‍ह्याची नोंद करण्‍यात आली असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक तानाजी बहिरम या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button