नवापूरच्या कोंडाईबारा घाटात वन्यतस्करांचा पर्दाफाश; बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहतूक केले जाणारे तब्बल २८ लाखांचे खैर लाकूड जप्त; वन विभागाची आजवरची सर्वांत मोठी कारवाई

नवापूर (विशेष बातमीदार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात वनविभागाने आजवरची सर्वांत मोठी कारवाई करताना खैर लाकडाच्या मोठ्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. वनविभागाने कोंडाईबारा घाटात छुप्या पद्धतीने ट्रकमध्ये भरून नेण्यात येणारे तब्बल २८ लाख २५ हजार रुपये किमतीचे खैर जातीचे लाकूड जप्त केले आहे. विशेष म्हणजे या लाकडाच्या तस्करीसाठी वनमाफियांनी चक्क बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य आणखीच वाढले आहे.
वनविभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबारच्या प्रादेशिक व वन्यजीव विभागाच्या सहायक वनसंरक्षकांना कोंडाईबारा घाटमार्गे एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात खैर लाकडाची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती गुप्त खबर्याकडून मिळाली होती. यानंतर १५ मे रोजी या घाटातील वन्य उपज तपासणी नाक्याजवळ सापळा रचण्यात आला. खबर्याने सांगितलेल्या वर्णनाचा ट्रक (क्र. जीजे एक्सएक्स ९९५५) येताना दिसताच वनविभागाच्या पथकाने सदरील वाहन अडवून चालकाकडे चौकशी सुरू केली.
यावेळी ट्रकचालकाने तेलंगाणातील एनटीपीसी एनओसी सादर केली. यावर वनविभागाच्या अधिकार्यांनी या कागदपत्रांची ऑनलाइन पटताळणी केली असता एनओसी व ऑनलाइन नोंदणी यात मोठी तफावत आढळली. पितळ उघड पडताच ट्रकचालकाने ट्रक तेथेच सोडून धूम ठोकली. यानंतर वनविभागाच्या पथकाने सदरील ट्रक जप्त करून नवापूरच्या कार्यालयात आणला. तेथे ट्रकमधील लाकडाची मोजणी केली असता त्यात तब्बल ८६२ नग (एकूण १९.५०२ घनमीटर) खैर जातीचे लाकूड आढळले. या मुद्देमालाची बाजारातील किंमत तब्बल २८ लाख २५ हजार १२४ रुपये असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे ही लाकूड तस्करी करताना पडकले जावू नये म्हणून चक्क बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचे या कारवाईत स्पष्ट झाल्याने लाकूड माफियांची मजल फारच वाढली असल्याचे उघड झाले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे वनसंरक्षक नेमू सोमराज, उपवनसंरक्षक संतोष सस्ते, दक्षता पथकाचे धुळे विभागीय अधिकारी राजेंद्र सदगीर, नंदुरबारच्या प्रादेशिक व वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक रोशन बुवा तसेच चिंचपाडा वनक्षेत्रपाल प्राशा पगार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत वनपाल सुजित बेडसे, युवराज भाबड, शीतल तोरवणे, वनरक्षक सतीश पद्मन, जितेंद्र पवार, रामदास पावरा, देवमन सूर्यवंशी, अमोल गावित, राहुल गावित, शिवराम गावित, मिताली गावित यांच्यासह कायम व रोजंदारी वनमजूर तसेच वाहन चालकांनी सहभाग घेतला.



