राजकीय रविवार : प्रकाशा कुंभमेळा निधीवरून भाजप-शिंदे गट भिडले; १३० कोटींवरून डॉ. हिना गावित व आ. रघुवंशींमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या प्रकाशा येथे होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने १३० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असला तरी हा निधी पदरात पडण्याआधीच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात भडका उडाला आहे. या निधीवरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी ‘१३० कोटींचा निधी मंजूर झाल्याचा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात तीन रुपयेही आलेले नाहीत’, असा गंभीर आरोप करीत भाजपवर निशाणा साधला आहे. तर भाजप नेत्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर केल्याचा दावा करत रघुवंशी यांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
तापी नदीकाठी वसलेले प्रकाशा हे धार्मिक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून, येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा राज्यासह देशभरातील भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र मानला जातो. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर विकासकामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. रस्ते, घाट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, निवास व्यवस्था, पार्किंग, सुरक्षा यंत्रणा आणि धार्मिक सुविधांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने शासनाकडून १३० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, हा निधी प्रत्यक्षात आला का आणि कोणत्या कामांना प्राधान्य दिले जात आहे, यावरून आता राजकीय संघर्ष उफाळून आला आहे.
विधान परिषद सदस्य असलेले आ. चंद्रकांत रघुवंशी (शिंदे गट) यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर थेट आरोप केले. “सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मंजूर होणारा निधी हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा मतदारसंघाचा नाही. हा निधी प्रकाशा व परिसरात येणार्या भाविकांच्या सुविधांसाठी आहे. गावकरी मागणी करतील ती कामे झाली पाहिजेत. मात्र, काही ठराविक ठेकेदारांच्या सांगण्यावरून कामांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे,” असा आरोप त्यांनी केला. “मुख्यमंत्र्यांनी १३० कोटी मंजूर केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अजून एक रुपयाही या कामांसाठी आलेला नाही,” असे स्पष्ट करीत त्यांनी निधीच्या घोषणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या आरोपांनंतर भाजपने तत्काळ आ. रघुवंशी यांच्यावर पलटवार केला. प्रकाशा कुंभमेळ्यासाठी विकासाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आल्याचे माजी खा. डॉ. हिना गावित यांनी सांगितले. आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी स्थानिक ग्रामस्थ, साधुसंत आणि प्रशासन यांना विश्वासात घेऊन तयार केलेला विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला होता. या आराखड्याला मंजुरी मिळून १३० कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर केला गेल्याचा दावा त्यांनी केला.
“मंजूर विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी काही जण राजकारण करत आहेत. सिंहस्थ कुंभमेळा धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा सोहळा आहे. यात राजकारण करण्यापेक्षा विकासकामांना गती देण्याची गरज आहे.”, असे सांगतानाच डॉ. गावित यांनी ‘जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, गावकरी आणि स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातूनच कामे केली जाणार आहेत. गावकरी सांगतील तीच कामे प्राधान्याने केली जातील,’ असेही स्पष्ट केले.
संघर्ष वाढण्याची चिन्हे…
प्रकाशा येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित नसून, हा विषय नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाशी जोडलेला महत्त्वाचा मानला जातो. या निमित्ताने लाखो भाविक, साधुसंत आणि पर्यटक येथे येण्याची शक्यता असल्याने पायाभूत सुविधांच्या विकासाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, या कुंभमेळ्यानिमित्त या ठिकाणी होणार्या विकासकामांसाठी आता फक्त निधी मंजूर झालेला असताना पहिल्याच टप्प्यात राज्याच्या सत्तेतील दोन पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये जुगलबंदी सुरू झाली आहे. यामुळे हा निधी प्रत्यक्ष जिल्ह्यात पोहोचून विकासकामे सुरू झाल्यानंतर हा राजकीय संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होऊ शकेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या या वातावरणात आता प्रत्यक्षात निधी कधी उपलब्ध होतो, विकासकामांना कधी सुरुवात होते आणि कुंभमेळ्याच्या तयारीला कितपत गती मिळते, याकडे प्रकाशासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.



