महाराष्ट्र

धडगाव तालुक्यात आणखी एका तोतया डॉक्टरला बेड्या; पदवी अन्‌ परवानगीविनाच सुरू होता रुग्णांच्या जीविताशी खेळ!

धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : धडगावच्या सातपुडा पर्वतरांगांतील अतिदुर्गम भाग जणू बोगस डॉक्टरांची फॅक्टरीच झाली की काय असा प्रश्न पडणारे प्रकार उघडकीस येत आहेत. तालुक्यातील वावी येथे डॉक्टर म्हणून वावरणाऱ्या बीए पास तरुणाची तोतयागिरी आदिवासी जनजागृती टीमने चव्हाट्यावर आणून २४ तास उलटत नाही तोच आता या तालुक्यातील छापारीचा पाटीलपाडा येथे आणखी एका तरुणाची बोगसगिरी उघडकीस आली आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने या बोगस डॉक्टर तरुणाचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छापारीचा पाटीलपाडा (ता. धडगाव) येथे येथे सुरेश पावरा यांच्या घरात अलिक असित रॉय (२५) हा तरुण कोणत्याही वैध पदवी आणि परवानगीशिवाय दवाखाना चालवत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी आरोग्य विभागाला कळवली होती. हा तरुण रुग्णांची तपासणी करून त्यांना गोळ्या औषधी देखील देत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली होती. यानंतर आरोग्य विभागाच्या यंत्रणेने संबंधित ठिकाणी विशेष पथक पाठवून खात्री करून घेतली.
यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने २२ एप्रिल रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास सुरेश पावरा यांच्या घरात सुरू असलेल्या दवाखान्यावर धाड टाकली. यावेळी संबंधित तरुण रुग्णांची तपासणी करताना आढळला. आरोग्य यंत्रणेच्या खऱ्या डॉक्टरांनी या तरुणाची चौकशी केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. पथकाने त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय चालविण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र तसेच हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानगीची कागदपत्रे मागितली. मात्र त्याच्याकडे यापैकी एकही कागद आढळला नाही.
यामुळे हा तरुण तोतया डॉक्टर असल्यावर शिक्कामोर्तब झाले. यावेळी खऱ्या डॉक्टरांच्या पथकाने कसून चौकशी केल्यानंतर या बंगाली तरुणाने आपले नाव अलिक असित रॉय (रा. लेनिनघर, एफ ब्लॉक, चांदपूर पोस्ट जुगबेरिया, ता. बराकपूर, जि. उत्तर  २४ परगणा (पश्चिम बंगाल / हल्ली मुक्काम छापारी पाटीलपाडा, ता. धडगाव) असल्याचे सांगितले.
यावेळी आरोग्य पथकाने त्याच्या दवाखान्याची जाडाझडती घेतली असता तेथे २६ हजार ५७४ रुपये किमतीचे वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारी उपकरणे आणि औषधी सापडली. आरोग्य विभागाच्या पथकाने ही सर्व सामग्री व उपकरणे जप्त केली. तसेच तातडीने धडगाव पोलिसांशी संपर्क साधला.
यानंतर डॉ. सुभाष बोंदऱ्या पावरा यांच्या तक्रारीवरून संबंधित बोगस डॉक्टर वर लोकांच्या जीवितास गैरहानी पोहोचविणे आणि तो तयारी करून फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने हालचाली करून तोतया डॉक्टर अलिक असित रॉय याला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी आता पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जयेश गावित अधिक तपास करीत आहेत.
चोवीस तासात दुसरी तोतयागिरी उघडकीस
ही घटना उघडकीस येण्याच्या अवघ्या २४ तास आधी धडगाव तालुक्यातीलच वावी येथे डॉक्टर म्हणून वावरणाऱ्या बिवस बाला या पश्चिम बंगालमधीलच बीए पास तरुणाची तोतायागिरी आदिवासी जनजागृती टीमचे कार्यकर्ते राकेश पावरा यांनी चव्हाट्यावर आणली होती. त्यानंतर अवघ्या २४ तासातच धडगाव तालुक्यातच आणखी एक बोगस डॉक्टर पकडला गेल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता धडगावसह अवघ्या सातपुडा पर्वत रांगांमधील अति दुर्गम भागात आरोग्य व्यवस्थेतील उनिवांचा गैरफायदा घेत बोगसगिरी करणाऱ्या डॉक्टरांच्या तपासण्या करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button