महाराष्ट्र

आनंदाची बातमी : पाणीच पाणी चोहीकडे; राज्‍यातील धरणांत यंदा ७ टक्‍के अधिक पाणी, साठा ६४.४१ टक्‍क्‍यांवर

मुंबई (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : यंदा पावसाळ्‍यात पडलेल्‍या धो धो पावसामुळे राज्‍यातील धरणांतील पाण्‍याच्‍या साठ्यात मोठी वाढ झाली असून, सध्‍याच्‍या घडीला राज्‍यातील सुमारे तीन हजारांहून अधिक धरणांमध्‍ये ६४.४१ टक्‍के पाणीसाठा शिल्‍लक असल्‍याची आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्‍हणजे गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत हा पाणीसाठा ७.१९ टक्‍क्‍यांनी अधिक असल्‍याचे ही आकडेवारी सांगते.
उन्‍हाळा आला की राज्‍यात सर्वत्र पाणीटंचाईच्‍या झळा बसायला सुरूवात होते. ‘पाण्‍यासाठी दाही दिशा’, अशी अवस्‍था राज्‍यभरात सर्वत्रच पाहायला मिळत असे. मात्र, यंदा वरूणराजाने महाराष्‍ट्रावर कृपा केली असून, त्‍यामुळे यंदाच्‍या उन्‍हाळ्‍यात पाणीटंचाईच्‍या झळा बसणार नसल्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सध्‍याच्‍या घडीला राज्‍यातील ३ हजार ११ धरणांमध्‍ये ६४.४१ टक्‍के पाणीसाठा शिल्‍लक आहे. यामध्‍ये सर्वाधिक ६६.५८ टक्‍के पाणी छत्रपती संभाजीनगर विभागात तर सर्वात कमी ६०.६१ टक्‍के पाणी कोकण विभागात शिल्‍लक आहे. याशिवाय नाशिक विभागातील धरणांत ६६.२७ टक्‍के, नागपूर विभाग ६५.८२ टक्‍के, अमरावती विभाग ६५.१५ टक्‍के, पुणे ६२.९६ टक्‍के असा पाणीसाठा शिल्‍लक आहे. गेल्‍या वर्षी मार्च महिन्‍याच्‍या सुरूवातीला राज्‍यातील सर्व धरणांत मिळून एकूण ५७.२२ टक्‍के पाणीसाठा शिल्‍लक होता. यंदा मात्र हा आकडा ७.१९ टक्‍क्‍यांनी वाढून ६४.४१ टक्‍क्‍यांवर पोहोचल्‍याने समाधान व्‍यक्‍त होत आहे.
राज्‍यातील सहा विभागांत मिळून एकूण तीन हजार ११ धरणे असून, त्‍यात १३८ मोठे, २६२ मध्‍यम तर २ हजार ६११ लघू प्रकल्‍पांचा समावेश आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button