महाराष्ट्र

‘गंगापूर’ प्रकरण कारवाईचा आसूड : सहायक जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या बदलीचा प्रस्‍ताव, इतर अधिकारी- कर्मचारर्‍यांवरही प्रशासकीय कारवाई सुरू

मुंबई (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्‍ह्याच्‍या नवापुर तालुक्‍यातील मौजे गंगापूर येथे जमीन संपादनात झालेल्‍या भ्रष्‍टाचार प्रकरण प्रशासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना भोवले आहे. या प्रकरणात सरकारने महसूल विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाईचा आसूड उगारला असून, सहायक जिल्‍हाधिकार्‍यांची बदली करण्‍यात येणार आहे.
गंगापूर (ता. नवापूर, जि. नंदुरबार) येथे जमीन संपादनात झालेला भ्रष्‍टाचार आणि बक्षीसपत्राच्‍या आधारावर नियमांचे उल्‍लंघन करून फेरफार झाल्‍याचे प्रकरण दहा दिवसांपूर्वी विधान परिषदेत उपस्‍थित करून आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी या प्रकरणाच्‍या चौकशीची मागणी केली होती. यावर उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्‍याची घोषणा केली होती. यानंतर १० मार्च रोजीच महसूल विभागाने या एसआयटी स्‍थापनेचा शासन आदेश जारी केला होता.
या संदर्भात विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, गंगापूर येथील जमीन संपादन प्रकरणात ५ जुलै २०२३ आणि १२ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आलेल्या मूळ जमीन मालकांच्या यादीत अनुसूचित जमातीच्या व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली होती. तसेच, या प्रकरणात जमिनीची मालकी आदिवासींकडून बिगर आदिवासींकडे बक्षीसपत्राद्वारे हस्तांतरित झाल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. याशिवाय, भू-संपादन निवाड्याशी संबंधित प्रकरणे लवाद व जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असताना फेरनिवाडा करण्यात आल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी नाशिक विभाग येथील विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आश्वासन विधान परिषदेत देण्यात आले होते. त्यानुसार महसूल विभागामार्फत १० मार्च २०२६ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
या प्रकरणात संबंधित सहायक जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आला असून, संबंधित इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली. या चौकशीमुळे गंगापूर जमीन संपादन प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल तपास होऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button