महाराष्ट्र

जय हनुमान : हनुमान जन्‍मोत्‍सवदिनी रंगली माकडांची पार्टी!; शिस्‍तबद्ध पद्धतीने रांगेत बसून मारला मिष्‍टान्नावर ताव; नंदुरबारमध्‍येही विविध कार्यक्रमांची मेजवानी

अकोला (वृत्तसंस्‍था / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शक्‍ती, युक्‍ती आणि एकनिष्‍ठ भक्‍ती यांचे उत्‍कृष्‍ट उदाहरण असलेल्‍या श्रीराम भक्‍त हनुमंताचा जन्‍मोत्‍सव सोहळा साजरा होत असतानाच महाराष्‍ट्रातील एका गावात या जयंतीदिनी चक्‍क माकडांची पंगत पाहायला मिळाली. यावेळी अनेक माकडांनी शिस्‍तबद्ध पद्धतीने एका रांगेत बसून आपल्‍या आवडत्‍या मिष्‍टान्नावर ताव मारला.
हनुमान, मारुती, बजरंगबली, अंजनीसूत अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या हनुमंताच्‍या जयंतीदिनी माकडांची ही खास पार्टी अकोला जिल्‍ह्याच्‍या बार्शीटाकळी तालुक्‍यातील कोथळी बुद्रुक गावात रंगली होती. या पंगतीच्‍या माध्‍यमातून येथे आलेल्‍या हनुमान भक्‍तांना शक्ती, भक्ती आणि भूतदयेचा अनोखा संगमच पाहायला मिळाला. वीस वर्षांपासूनची परंपरा
कोथळी बुजरूक गावाजवळील घनदाट जंगलात वसलेल्या मुंगसाजी महाराज संस्थानच्या मंदिर परिसरात गेल्या वीस वर्षांपासून ही अनोखी परंपरा सुरू आहे. हनुमान जयंतीनिमित्त ही अनोखी आणि हृदयाला स्पर्श करणारी परंपरा येथे दरवर्षी पाहायला मिळते. इथे माणसांसोबतच चक्क माकडांसाठीही पंगत बसवली जाते आणि विशेष म्हणजे ही माकडेही अगदी शिस्तीत बसून जेवणाचा आस्वाद घेतात. रामदास महाराज शिंदे यांच्या पुढाकारातून दरवर्षी हनुमान जयंतीदिनी माकडांसाठी ही खास पंगत आयोजित केली जाते. या पंगतीत माकडांना आवडणारे चणे, सोयाबीन, गव्हाच्या बिट्ट्या आणि विविध मिष्टान्न पदार्थ वाढले जातात. रामनवमी ते हनुमान जयंतीदरम्यान पंचक्रोशीतील भाविक मोठ्या श्रद्धेने येथे दर्शनासाठी येतात. निसर्गाच्या सानिध्यात आणि घनदाट जंगलात वसलेले हे मंदिर भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरतो. रामदास महाराज व माकडांमधील संवादही विशेष असतो. देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह साजरा होत असताना या अनोख्या परंपरेचीसर्वत्र मोठी चर्चा होत आहे.
नंदुरबारमध्‍ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
हनुमान जयंतीनिमित्त नंदुरबार शहरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. शहरातील सुमारे ७५ छोट्या-मोठ्या हनुमान मंदिरांमध्‍ये महाआरती, अभिषेक, सुंदरकांड व महाप्रसादाचे आयोजन करण्‍यात आले असून, मंदिरांच्‍या रंगरंगोटीचे काम बुधवारी संध्‍याकाळीच पूर्ण करण्‍यात आले. मोठा मारुती मंदिर, कल्‍याणेश्‍वर हनुमान मंदिर, हाट दरवाजाजवळील हनुमान मंदिर, चित्तेनगर परिसरातील हनुमान मंदिर यासह विविध मंदिरांमध्‍ये सकाळी ६ वाजेपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. देसाईपुरा भागातील उत्तराभिमुख श्री विजय हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणपतिष्‍ठा सोहळा आज हनुमान जयंतीदिनी पार पडत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button