नंदुरबार शहर

एक कॉल अन्‌ सातव्या मिनिटाला वाचली २३ गोवंशांची कत्तल; नंदुरबारचे बीट मार्शल अंमलदार राजेश वसावे यांची धडाकेबाज कारवाई, १३ लाखांचा मुद्देमाल जप्‍त

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नियंत्रण कक्षातून आलेल्या एका कॉलनंतर अवघ्या सातव्या मिनिटाला घटनास्थळ गाठून शहर बीट मार्शल अंमलदारांनी कत्तलीसाठी घेऊन निघालेल्या वाहनाला अडवत तब्बल २३ गोवंश जनावरांची सुटका केली. एखाद्या चित्रपटात शोभेल अशी ही कारवाई नंदुरबार शहर पोलीस दलात कार्यरत असलेले बीट मार्शल पोलिस अंमलदार राजेश वसावे यांनी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी भल्या पहाटे ४.५८ वाजता नियंत्रण कक्षातील महिला मंडळ कांती वसावे यांनी रात्रगस्तीवर असलेले बीट मार्शल पोलिसामुलदार राजेश वसावे यांना कॉल केला. शहरातील करण चौफुली कडून धुळे चौफुलीच्या दिशेने निघालेल्या एका आयशर वाहनातून (क्र. एमएच १८ बीझेड ३७१२) काही गोवंश जनावरांना कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती या कॉलद्वारे देण्यात आली. राजेश वसावे यांनी तातडीने ही माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना कळवली आणि अवघ्या सातव्या मिनिटाला काही सहकाऱ्यांसह हे वाहन येत असलेल्या ठिकाणी धाव घेतली.
काही क्षणातच संबंधित वाहन येताना दिसताच राजेश वसावे व इतरांनी ते वाहन अडवून तपासणी केली. यावेळी वाहनात तब्बल २३ गोवंश जनावरे लहान दोऱ्यांनी घट्ट बांधून ठेवण्यात आल्याचे दिसून आले. ही जनावरे वाहना त त्यांना हालचालही करता येणार नाही अशा पद्धतीने दाबण्यात आली होती. यावेळी वाहनात किरण दिलीप पाटील (३०, रा. छाईल, ता. साक्री, जि. धुळे), गणेश नाना बरडे (२९, रा. बासर, ता. साक्री, जि. धुळे), खंडू अनिल बरडे (१९, रा. बासर, ता. साक्री, जि. धुळे), अंकुश अर्जुन बागुल (३४, रा. इसर्डे, ता. साक्री, जि. धुळे) असे चौघेजण होते. पोलिसांनी गाडीतील गोवंशांबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.
राजेश वसावे व सहकाऱ्यांनी ही सर्व २३ गोवंशीय जनावरे व वाहन असा एकूण १२ लाख ८१ रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सर्व आरोपींच्या विरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, सर्व जनावरांना तातडीने गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबारचे उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलेश देसले, उपनिरीक्षक किरण पाटील, छगन चव्हाण, भुनेश मराठे, पोहेकॉ भटू धनगर, किरण मोरे, प्रवीण वसावे, भगवान मुंडे, नरेंद्र पाडवी, मपोकॉ निंबाबाई वाघमोडे आणि बीट मार्शल कॉन्स्टेबल राजेश वसावे यांनी केली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button