ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांनो आजारांची तपासणी करून घ्या; नंदुरबारमध्ये शुक्रवारपासून तीन दिवसीय शिबिर; आ. चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाचा उपक्रम

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्यांना आवश्यक सहायक साधनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शहरात सामाजिक न्याय विभागाच्या ‘अलिमको’ अंतर्गत राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून आ. चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
नंदुरबार शहरातील छत्रपती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे २४, २५ व २६ एप्रिल असे तीन दिवस हे शिबिर संपन्न होणार आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची सखोल तपासणी केली जाईल. तपासणीनंतर शासनाच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना पुढील कालावधीत विविध साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. यात व्हील चेअर आणि बॅटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकल (८०% पेक्षा जास्त अस्थिव्यंग असलेल्यांसाठी), कानाचे मशीन, कुबडी, काठी आणि सीपी चेअर, अंधांसाठी स्मार्ट काठी, ब्रेल किट आणि १० वी नंतर शिकणाऱ्या अंध विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन, टीएलएम किट आदींचा समावेश आहे.
शिबिरात येताना नागरिकांनी आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र (दिव्यांगांसाठी), उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्ड, यूडीआयडी कार्ड सोबत आणावे. या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन शिवसेनेचे धुळे-नंदुरबार लोकसभा संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी आणि शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी केले आहे.



