नंदुरबार शहरात ॲक्टिव्हाला मोटारसायकलने उडवले, ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना तोडला दम; धडक देणारे मात्र फरार

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरात ॲक्टिव्हाला मोटारसयकलने मागून दिलेल्या धडकेत एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शहरातील जानता राजा चौक परिसरात शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात दगावलेल्या व्यक्तीचे नाव पुंडलिक रामभाऊ सूर्यवंशी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंडलिक सूर्यवंशी (६०, रा. प्लॉट नं. ८६, वर्धमान नगर, नंदुरबार) हे शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ॲक्टिव्हा (क्र. एमएच ३९ एएच ३९८६) गाडी घेऊन बाजार करण्यासाठी निघाले होते. जाणता राजा चौकातील कल्याणी गॅस एजन्सी समोरील रस्त्यावरून नेहरूनगरकडे जाताना पाठीमागून येणाऱ्या मोटरसायकलने (क्र. एमएच १५ एएच ०४८५) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की त्यामुळे सूर्यवंशी रस्त्यावर फेकले गेले. यात त्यांच्या शरीरासह डोक्याला गंभीर जखम झाली.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या नंदुरबार शहर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सूर्यवंशी यांना तत्काळ नजीकच्या स्मित हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, जखमा गंभीर असल्याने उपचार सुरू असताना काही क्षणातच पुंडलिक सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यानच्या काळात अपघातानंतर सूर्यवंशी यांच्या वाहनाला धडक देणारा मोटारसायकलस्वार आणि त्याचा सहकारी जखमेला मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून फरार झाले होते.
दरम्यान, याप्रकरणी पुंडलिक सूर्यवंशी यांचा मुलगा अक्षय सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून संबंधित मोटारसायकलस्वाराच्या विरोधात नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला असून, प्रकरणाचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल ज्योतिबा दीपक करीत आहेत.



