राजकारण

भाजपच्‍या विरोधाने गाजली नंदुरबार नगर पालिकेची सभा; संख्‍याबळाच्‍या जोरावर सत्ताधार्‍यांकडून सगळे १६ विषय मंजूर; पर्यटनस्‍थळ विकास, स्‍ट्रक्‍चरल ऑडिटवर खडाजंगी

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : विरोधी बाकांवर बसलेल्‍या भारतीय जनता पक्षाच्‍या नगरसेवकांच्‍या विरोधी आवाजाला न जुमानता नंदुरबार नगर परिषदेच्‍या सर्वसाधारण सभेत सत्ताधार्‍यांनी संख्‍याबळाच्‍या जोरावर विषय पत्रिकेवरील सर्व १६ विषय मंजूर करून घेतले. सभेत बोलू दिले जात नसल्‍याचे पाहून अखेर विरोधकांनी पाच विषयांना लेखी आक्षेप नोंदवले. विरचक प्रकल्‍पात पर्यटनस्‍थळ विकसित करण्‍यासह पालिकेच्‍या व्‍यापारी गाळ्‍यांचे स्‍ट्रक्‍चरल ऑडिट करून ते निर्लेखित करण्‍याच्‍या मुद्यांवर सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्‍यांमध्‍ये या सभेत खडाजंगी पाहायला मिळाली.
नंदुरबार नगर पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विषय पत्रिकेवर १६ विषय असलेल्या या सभेत उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह सर्व विषय समित्यांचे सभापती आणि नगरसेवकांची उपस्थिती होती. नगरपालिकेच्या मालकीच्या इमारती आणि व्यापारी गाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ते निर्लेखित करण्यासह त्यांचे पुनर्निमान करण्याच्या विषयावर या सभेत जोरदार चर्चा झाली. यावर बराच वेळ चर्चा झाल्यानंतर हाट दरवाजा परिसरातील मुख्याधिकाऱ्यांचे जुने निवासस्थान तोडून तेथे व्यापारी गाळे उभारण्याचा विषय या सभेत मंजूर करण्यात आला.
तसेच पालिकेच्या शाळा क्रमांक दहाची जीर्ण इमारत तोडून त्यासाठी येणाऱ्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली. त्याआधी या इमारती तोडण्यासाठी लागणाऱ्या निधीच्या मंजुरीला विरोधकांनी आक्षेप घेतला. मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या जागी वाहनतळ उभारावे आणि शाळेची जुनी इमारत पाडण्यासाठी खर्च करण्याऐवजी शाळेसाठी नवीन इमारत उभारावी अशी विरोधकांची मागणी होती. मात्र, या दोन्ही विषयांना असलेला विरोध सत्ताधाऱ्यांनी हाणून पडला.
विरचक धरणावर होत असलेला पर्यटन प्रकल्प पालिकेमार्फत राबविण्याचा विषय चर्चेला आल्यानंतर त्याला विरोधकांनी विरोध दर्शवला. मात्र अखेर पर्यटन विकास विभागाकडून विरचक मध्यम प्रकल्पात पर्यटन विकासासाठी पर्यटनस्थळ उभारणीला मान्यता देण्यात आली. पालिका हद्दीतील ग्रीन झोन उठविण्याच्या दोन विषयांनाही विरोधकांनी विरोध दर्शवला.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button