‘नंदुरबार पोस्ट’चा दणका : गुटखा विक्रेत्यांवर कारवाई सुरू; तळोद्यात ‘अन्न व औषधी’ पथकाचा छापा; ३८ हजारांचा गुटखा जप्त, एकावर गुन्हा
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : बंदी झुगारून जिल्हाभरात खुलेआम सुरू असलेल्या गुटखा विक्रीच्या विरोधात ‘नंदुरबार पोस्ट’ने बातम्यांच्या माध्यमातून उठवलेल्या आवाजाला अखेर यश आले आहे. ‘नंदुरबार पोस्ट’च्या वृत्तांची दखल घेत अखेर अन्न व औषधी प्रशासनाने गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू केली असून, याअंतर्गत तळोदा शहरात पहिली कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी अन्न व औषधी प्रशासनाने छापा टाकून एकाकडून तब्बल ३८ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करीत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
‘नंदुरबार पोस्ट’ने ‘नंदुरबार बनले तस्करीचे द्वार : गुजरात-मध्य प्रदेशातून गुटख्याची महाराष्ट्रात ‘शाही’ एन्ट्री’ आणि ‘नंदुरबार जिल्ह्यात गुटखाबंदीची ऐसीतैशी : माफियांचा सुळसुळाट, खुलेआम सुरू आहे विक्री’ या मथळ्यांखाली सलग दोन दिवस बातम्या प्रकाशित करून प्रतिबंधित गुटख्याच्या जिल्हाभर सुरू असलेल्या खुलेआम विक्रीवर प्रकाश टाकला होता. याची तत्काळ दखल घेत अन्न व औषधी प्रशासनाने तळोदा शहरात मोठी कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा येथील मेन रोडवरील अर्जून पान स्टॉल या दुकानावर खुलेआम प्रतिबंधित गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार या विभागाच्या पथकाने सापळा रचून या पानटपरीवर छापा टाकला. यावेळी तेथे राजेंद्र मक्कन जावरे (४८, रा. भोई पंचवाडीजवळ, तळोदा) हा गुटख्याची विक्री करताना आढळला.
यावेळी अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने या पान स्टॉलची झडती घेतली असता तेथे तानसेन, राजश्री, विमल, रजनीगंधा आदी पानमसालाच्या पुड्या आणि त्यासोबत मिश्रीत करावयाच्या तंबाखुच्या पूड्या असा प्रतिबंधित माल आढळला. हा एकूण ३८ हजार ३२२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी संकेत आबा सदाफुले यांच्या तक्रारीवरून राजेंद्र जावरे याच्याविरोधात अन्न सुरक्षा मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक निलेश साळी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



